उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 22:00 IST2025-10-20T21:59:23+5:302025-10-20T22:00:19+5:30
सत्येंद्र साह यांच्या अटकेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली. राजदच्या कार्यकर्त्यांनीही या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला

उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
पटना - सासाराम विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार सत्येंद्र साह यांना उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अटक करण्यात आली आहे. सत्येंद्र साह उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक केंद्रावर गेले होते. त्याठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर झारखंडच्या गढवा भागातील एका जुन्या दरोड्याच्या खटल्यात पोलिसांनी त्यांना अटक केली. २००४ साली घडलेल्या घटनेसाठी पोलिसांनी वॉरंटच्या आधारे त्यांना तात्काळ ताब्यात घेतले.
सत्येंद्र साह यांच्या अटकेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली. राजदच्या कार्यकर्त्यांनीही या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला. स्थानिक पोलिसांनी सत्येंद्र साह यांना झारखंड पोलिसांकडे सुपूर्द केले. त्यांना गढवा कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. सत्येंद्र साह यांच्याविरोधात अनेक गुन्हेगारी स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. २०१० साली सत्येंद्र साह यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. काही वर्षांपूर्वी त्यांनी महापालिकेच्या महापौर पदासाठी त्यांच्या पत्नीला रिंगणात उतरवले. यावेळी राजदकडून विद्यमान आमदार राजेश गुप्ता यांचे तिकीट कापून सत्येंद्र साह यांना पक्षाने उमेदवारी दिली होती.
पोलिस सुरक्षेत झाली अटक
उमेदवारी अर्ज दाखल करताना सत्येंद्र साह यांच्यासोबत मोठ्या संख्येने त्यांचे समर्थक होते. त्यामुळे कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत सत्येंद्र साह यांना अटक करण्यात आली. त्यावेळी काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. राजदच्या कार्यकर्त्यांनी हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केला. राजकीय प्रचारात अडथळा यावा यासाठी सत्येंद्र साह यांना अटक करण्यात आली असा आरोप कार्यकर्त्यांनी केला. मात्र कोर्टाच्या आदेशाने ही कारवाई झाली आहे. त्याचा निवडणुकीची काही देणेघेणे नाही असा दावा पोलिसांनी केला आहे.
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यात सत्येंद्र साह यांच्या अटकेनंतर राष्टीय जनता दलाच्या रणनीतीला झटका बसला आहे. आता पक्षाकडे ऐन वेळी पर्यायी उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. मात्र सत्येंद्र साह यांची उमेदवारी पक्ष कायम ठेवतो का हेदेखील पाहणे गरजेचे आहे.