bihar election 2020 rahul gandhi statement slams government before rally | "कोरोना असो वा बेरोजगारी, खोट्या आकड्यांनी संपूर्ण देश त्रस्त", राहुल गांधींचा हल्लाबोल

"कोरोना असो वा बेरोजगारी, खोट्या आकड्यांनी संपूर्ण देश त्रस्त", राहुल गांधींचा हल्लाबोल

नवी दिल्ली -  कोरोना महामारीच्या संकटात बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. भाजपा जेडीयू याठिकाणी एकत्र निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज बिहारमधील दोन प्रचार रॅलीत सहभागी होणार आहेत. नवादाच्या हिसुआमध्ये पहिली सभा तर भागलपूरच्या कहलगावमध्ये दुसरी सभा असणार आहे. निवडणूक प्रचार रॅलीच्या आधी राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शायरी अंदाजात त्यांनी निशाणा साधला आहे.

"कोरोना असो वा बेरोजगारी, खोट्या आकड्यांनी पूर्ण देश त्रस्त" असं म्हणत राहुल गांधी यांनी टीकास्त्र सोडलं आहे. शुक्रवारी (23 ऑक्टोबर) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबतचे ट्विट केले आहे. "तुम्हारे दावों में बिहार का मौसम गुलाबी है, मगर ये आंकड़े झूठे हैं ये दावा किताबी है! कोरोना असो वा बेरोजगारी, खोट्या आकड्यांनी पूर्ण देश त्रस्त, आज बिहारमध्ये मी तुमच्यासोबत असणार आहे. या आणि या खोट्यापासून तुमची सुटका करा" असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. 

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जाहीरनाम्यात जनतेला कोरोनावरील लस मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे. या आश्वासनावरून विरोधकांनी भाजपला घेरले आहे. भाजपा कोरोनावरील लसीचा राजकीय फायदा उठवू पाहत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. 'केंद्र सरकारने नुकतीच कोविड लसीबाबत धोरण आखले आहे. तुमच्या राज्यात विधानसभा निवडणुका कधी आहेत, त्यानुसार तुम्हाला कोरोनावरील लस कधी मिळेल, हे तुम्हाला समजेल' अशी उपरोधिक टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे केली आहे. 

तुम्ही मत द्या; आम्ही मोफत लस देऊ! बिहारसाठी भाजपचे आश्वासन, विरोधकांची टीका

तुम मुझे व्होट दो मै तुम्हे व्हॅक्सिन दुंगा, अशा शब्दांत काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. भाजप आपल्या तिजोरीतून लशीचे पैसे देणार आहे का? जर सरकारच्या तिजोरीतून लशीचे पैसे दिले जाणार असतील तर फक्त बिहारलाच मोफत लस का?असा सवाल त्यांनी केला. आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही केंद्राला लक्ष्य केले. बिगरभाजपशासित राज्यांचे काय? ज्या भारतीयांनी भाजपला मतदान केले नाही, त्यांनी कोरोनावरील मोफत लस मिळणार नाही का? असा सवाल केजरीवाल यांनी विचारला.

भाजपाचे प्रत्युत्तर

कोरोनावरील लशीचे उत्पादन सुरू झाल्यावर बिहारमधील जनतेला ती लस मोफत उपलब्ध केली जाईल. भाजपच्या जाहीरनाम्यातील हे पहिले वचन आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सीतारामन यांनी ही घोषणा केल्यानंतर लगेचच एनडीएचा घटक पक्ष असलेल्या अण्णा द्रमुकचे तमिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनीही तमिळनाडूच्या जनतेला कोरोनावरील लस मोफत देण्याचे आश्वासन दिलं आहे. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी विरोधकांना उत्तर देत म्हटलं की, ही लस विकायची की मोफत द्यायची हे त्या त्या राज्यने ठरवायचे आहे. आरोग्य हा राज्याचा मुद्दा असल्याने बिहार भाजपने लस मोफत देण्याचे वचन दिले आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: bihar election 2020 rahul gandhi statement slams government before rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.