८ आधार, ८ लायसन्स, १६ मतदार कार्ड आणि... व्यक्तीकडे सापडला बनावट कागदपत्रांचा खजिना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 13:57 IST2025-08-30T13:56:49+5:302025-08-30T13:57:56+5:30
Bihar Crime News: बिहारमधील भारत-नेपाळ सीमेजवळून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील घोडासहन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायबर कॅफे चालवणाऱ्या भूषण चौधरी याच्या मालमत्तांवर पोलिसांनी टाकलेल्या धाडींमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

८ आधार, ८ लायसन्स, १६ मतदार कार्ड आणि... व्यक्तीकडे सापडला बनावट कागदपत्रांचा खजिना
बिहारमधील भारत-नेपाळ सीमेजवळून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील घोडासहन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायबर कॅफे चालवणाऱ्या भूषण चौधरी याच्या मालमत्तांवर पोलिसांनी टाकलेल्या धाडींमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांना घटनास्थळावरून विविध देशांचं चलन, पासबूक, परदेशी घड्याळ, ८ आधारकार्ड,८ ड्रायव्हिंग लायसन्स आणि १६ मतदार ओळखपत्र सापडली आहेत. याशिवाय सहा श्रम कार्ड आणि ४ बँक पासबुक, एक चेकबूक आणि ९ स्कॅनर जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्रेही पोलिसांच्या हाती लागली आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचं गांभीर्य वाढलं आहे.
दरम्यान, भूषण चौधरी याचा मुलगा गोलू चौधरी याला उत्तर प्रदेश पोलिसांनी आधीच अटक केल्याची माहिती समोर आल्याने प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं बनलं आहे. गोलू हा दहशतवादी फंडिगशी संबंधित कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केल्यानंतर गोलू याला आपल्यासोबत नेऊन अधिक चौकशी सुरू केली आहे. तसेच मोतिहारी पोलिसांनीही फंडिंगच्या नेटवर्कचा तपास करण्यासाठी त्याला रिमांडवर घेण्याची तयारी सुरू केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या संपूर्ण प्रकरणाचा मास्टर माईंड आलोक कुमार नावाची व्यक्ती आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तोच हे संपूर्ण नेटवर्क चालवायचा असे बोलले जात आहे. तसेच नेपाळसोबतची सीमा खुली असल्याने येथून तस्करी, बनावट नोटा आणि दहशतवादी फंडिंगसारखे प्रकार समोर आले आहेत. नेपाळमार्गे जैश ए मोहम्मद आणि इतर दहशतवादी संघटनांसाठी फंडिंग चॅनेल सुरू केले जात आहेत, असा अलर्ट गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे.