'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 22:59 IST2025-10-15T22:57:56+5:302025-10-15T22:59:11+5:30
Patna Airport Viral Video: बिहारमधील काँग्रेस पक्षाचा अंतर्गत कलह आज पाटणा विमानतळावर उघडपणे समोर आला.

'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
बिहारमधील काँग्रेस पक्षाचा अंतर्गत कलह आज पाटणा विमानतळावर उघडपणे समोर आला. विक्रम विधानसभा मतदारसंघातील तिकीट वाटपावरून संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट सुरू झाली, ज्याचे रूपांतर लगेचच हिंसक हाणामारीत झाले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज जेव्हा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राजेश राम, बिहार काँग्रेस प्रभारी कृष्णा अल्लावरू आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते शकील अहमद खान पाटणा विमानतळावर दाखल झाले, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरुद्ध मुर्दाबादच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. घोषणाबाजीनंतर कार्यकर्त्यांमध्ये झटापट सुरू झाली आणि त्यांच्यातील वाद पेटला.
विक्रम मतदारसंघासाठी काँग्रेसने माजी आमदार अनिल शर्मा यांना तिकीट दिले आहे. याच निर्णयामुळे संतप्त झालेल्या अशोक गगन समर्थकांनी विमानतळावर गोंधळ घातला. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हाणामारी झाल्यामुळे पक्षातील अंतर्गत वादाची चर्चा आता तीव्र झाली. कार्यकर्त्यांनी थेट वरिष्ठ नेत्यांकडे दुर्लक्ष करून गोंधळ घातल्याने तिकीट वाटपावरून पक्षांतर्गत संघर्ष शिगेला पोहोचल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे आता हा मुद्दा राजकीय वादाला तोंड फुटू शकते.
इस वीडियो में पटना एयरपोर्ट के बाहर जिस व्यक्ति के साथ मारपीट हो रही है, वह राहुल गांधी का करीबी और कांग्रेस का एक राष्ट्रीय पदाधिकारी बताया जा रहा है।
— Amit Malviya (@amitmalviya) October 15, 2025
आरोप है कि उन्होंने प्रदेश के शीर्ष नेताओं के साथ मिलकर विधानसभा की सीटें बेच दीं।
सच क्या है, यह तो कांग्रेस ही बता पाएगी। pic.twitter.com/kyQFghUtD7
भाजप नेते अमित मालवीय यांनी या घटनेचा व्हिडीओ त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून शेअर केला. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, "पाटणा विमानतळाबाहेर ज्या व्यक्तीवर हल्ला होत आहे तो राहुल गांधींचा जवळचा सहकारी आणि राष्ट्रीय काँग्रेसचा पदाधिकारी असल्याचे म्हटले जाते. त्यांनी राज्यातील वरिष्ठ नेत्यांसह विधानसभेच्या जागा विकल्या, असा त्यांच्यावर आरोप आहे. पण खरे काय आहे, हे काँग्रेसच सांगू शकेल."