‘तुमच्या पाया पडतो, पण कामे लवकर पूर्ण करा’; नितीश कुमारांची अभियंत्याला विनंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 11:36 IST2024-07-11T11:35:56+5:302024-07-11T11:36:53+5:30
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बुधवारी पाटणा येथे मरीन ड्राइव्हच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन केले.

‘तुमच्या पाया पडतो, पण कामे लवकर पूर्ण करा’; नितीश कुमारांची अभियंत्याला विनंती
पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बुधवारी पाटणा येथे मरीन ड्राइव्हच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन केले. यावेळी एक विचित्र घटना घडली. उद्घाटनानंतर समोर उभ्या असलेल्या बांधकाम विभागाच्या अभियंत्याला बोलावून हात जोडून पाया पडण्याचा प्रयत्न नितीश कुमार यांनी केला. हे पाहून तेथे उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा, सम्राट चौधरी तसेच विधानसभा अध्यक्ष नंदकिशोर यादवही आश्चर्यचकित झाले. नितीशकुमार यांनी प्रकल्प अभियंत्याला काम लवकर पूर्ण करण्यास सांगितले. ते म्हणाले की, तुमच्या मी पाया पडतो; पण काम लवकरात लवकर पूर्ण करा. पाया पडण्यासाठी ते पुढे येताच इतर अधिकाऱ्यांनी त्यांना रोखले.
मुख्यमंत्र्यांच्या या वागण्याने तेथे उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले. काही दिवसांपूर्वी विभागीय सचिवांसमोरही त्यांनी असेच काम पूर्ण करण्यासाठी हात जोडले होते.