अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मानधनात वाढ; निवडणुकीपूर्वी नितीश कुमार यांची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 13:55 IST2025-09-08T13:53:54+5:302025-09-08T13:55:53+5:30
Bihar Election: बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी नितीश कुमार सरकारने अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीसांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केली.

अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मानधनात वाढ; निवडणुकीपूर्वी नितीश कुमार यांची मोठी घोषणा
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी नितीश कुमार सरकारने अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीसांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केली. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दोन हजारांनी वाढ करण्यात आली आहे. तर, अंगणवाडी मदतनीसांच्या मानधनात १५०० रुपयांची वाढ करण्यात आली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्वतः सोशल मीडियावरून माहिती दिली. बिहारमधील बालके आणि गर्भवती महिलांचे आरोग्य व पोषण सुधारण्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे बिहार सरकारने हा निर्णय घेतला आहे, असे नितीश कुमार म्हणाले.
राज्य में बच्चों एवं गर्भवती महिलाओं के पोषण एवं जीवन स्तर में सुधार करने में आंगनबाड़ी सेविकाओं एवं सहायिकाओं की महत्वपूर्ण भूमिका है। उनकी इसी भूमिका का सम्मान करते हुये हमलोगों ने उनके मानदेय में वृद्धि करने का निर्णय लिया है। अब आंगनबाड़ी सेविका का मानदेय 7,000 रूपये से…
— Nitish Kumar (@NitishKumar) September 8, 2025
बिहारमधील अंगणवाडी सेविकांचे मानधन ७००० रुपयांवरून ९००० रुपये करण्यात आले. तर, मदतनीसांचे मानधन ४००० रुपयांवरून ५५०० रुपये करण्याचे निर्देश विभागाला देण्यात आले. नोव्हेंबर २००५ मध्ये सरकार स्थापन झाल्यापासून आम्ही गर्भवती महिला आणि बालकांचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम केले आहे, त्यासाठी एकात्मिक बाल विकास प्रकल्पाद्वारे सहा प्रकारच्या सेवा पुरवल्या जात आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
"अंगणवाडी केंद्रांद्वारे लाभार्थ्यांना या सेवा पुरवण्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे, त्यांचे मानधन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे मनोबल वाढेल आणि एकात्मिक बाल विकास सेवांमध्ये आणखी सुधारणा होईल", असेही ते म्हणाले.