खळबळजनक! सोनोग्राफीत जुळी मुलं, डिलिव्हरीनंतर दिलं एकच बाळ, नेमकं काय आहे हे प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 17:06 IST2026-03-18T17:05:02+5:302026-03-18T17:06:11+5:30
'आशा किरण आरोग्य सेवा सदन'मध्ये डिलिव्हरीनंतर एका महिलेने दावा केला आहे की, तिने जुळ्या मुलांना जन्म दिला होता, मात्र तिला फक्त एकच बाळ सोपवण्यात आलं.

फोटो - ndtv.in
बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील एका खासगी रुग्णालयावर नवजात बाळ चोरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. वीरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मीपूर चौक येथील 'आशा किरण आरोग्य सेवा सदन'मध्ये डिलिव्हरीनंतर एका महिलेने दावा केला आहे की, तिने जुळ्या मुलांना जन्म दिला होता, मात्र तिला फक्त एकच बाळ सोपवण्यात आलं. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.
ममता कुमारीने दिलेल्या माहितीनुसार, मुझफ्फरपूर जिल्ह्यातील अहियापूर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या शिवराहा चतुर्भुज गावातील रहिवासी रोशन कुमारसोबत तिचं लग्न झालं आहे. दुसऱ्यांदा गरोदर असताना गेल्या वर्षी ती आपल्या माहेरी भवानंदपूर नवटोलिया येथे आली आणि वीरपूरमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेऊ लागली. उपचारादरम्यान डॉक्टरांनी सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार शिवानी सोनोग्राफी पकडी येथे तपासणी केली असता, दोन मुलं असून दोन्ही सुदृढ असल्याचं सांगण्यात आलं होतं.
१९ नोव्हेंबर २०२५ रोजी वीरपूरच्या सरकारी रुग्णालयात गेली. तिथे तिला सांगण्यात आलं की, "पोटामध्ये दोन मुलं आहेत. डिलिव्हरी येथे केल्यास एक बाळ जन्म घेईल पण दुसरं बाळ दगावण्याची शक्यता आहे." तिथल्या नर्सने तिला चांगल्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर महिला लक्ष्मीपूर चौकातील 'आशा किरण आरोग्य सेवा सदन'मध्ये गेली. तिथे तिची भेट निशा कुमारी आणि उजाला कुमारी यांच्याशी झाली. "डॉक्टर खूप चांगले आहेत, तुमची प्रसूती सुरक्षितपणे करून देऊ" असं आश्वासन त्यांनी दिलं. "मी मुलांना जन्म दिला तेव्हा मला दोन बाळांच्या रडण्याचा आवाज ऐकू आला, त्यानंतर मी बेशुद्ध झाले" असं महिलेने म्हटलं आहे.
थोड्या वेळाने निशा कुमारीने महिलेच्या आईच्या हातात फक्त एक मुलगी सोपवली. सूज आल्याने पोट मोठं दिसत होतं असं कारण देण्यात आलं. दोन मुलं होती असं सांगितलं असता निशा कुमारीने आईसोबत आणि महिलेसोबत शिवीगाळ व मारहाण केली. "एक मुलगी घ्या आणि इथून निघून जा" अशी धमकी दिल्याने भीतीपोटी मायलेकी घरी परतल्या. फेब्रुवारी महिन्यात महिलेला समजलं की तिने एका मुलाला आणि एका मुलीला जन्म दिला होता. ही माहिती मिळाल्यावर नातेवाईक आणि ग्रामस्थांनी क्लिनिकवर जाऊन निशा कुमारीकडे बाळाची मागणी केली असता ती पळून गेली.