अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 14:16 IST2025-11-06T14:16:03+5:302025-11-06T14:16:42+5:30
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली. मात्र यामागे विरोधकांचा हात आहे असा दावा भाजपाने केला.

अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
सीतामढी - बिहार विधानसभा निवडणुकीत सीतामढी मतदारसंघातून लढणारे भाजपा उमेदवार सुनील कुमार पिंटू पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे निकटवर्तीय मानले जाणारे पिंटू मतदानाच्या पूर्वी चांगलेच चर्चेत आले आहेत. अलीकडेच एका जाहीर सभेत अमित शाह यांनी पिंटू यांना आपला खास मित्र असल्याचं सांगत, पिंटू बडा आदमी बनेगा असं विधान केले होते. त्यानंतर काही तासांनी सोशल मीडियावर पिंटू यांचा कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
या व्हायरल व्हिडिओत एका महिलेसोबत सुनील कुमार पिंटू आक्षेपार्ह दृश्यात दिसत आहेत. ३ ते ४ वेगवेगळ्या व्हायरल क्लिप मोबाईल फोन आणि सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे. लोक विविध ग्रुप आणि व्हॉट्सअपमध्ये हा व्हिडिओ फॉरवर्ड करत आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली. मात्र यामागे विरोधकांचा हात आहे असा दावा भाजपाने केला तर काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाने हा मुद्दा नैतिकतेशी जोडत भाजपावर हल्लाबोल सुरू केला आहे. त्यामुळे मतदानाला काही तास शिल्लक असताना भाजपाची डोकेदुखी वाढली आहे.
व्हिडिओची पडताळणी सुरू
स्थानिक पातळीवर सायबर सेलकडून या व्हिडिओची पडताळणी सुरू झाली आहे. सीतामढी निवडणुकीच्या प्रचारात अचानक भाजपा उमेदवार पिंटू यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. चहाच्या दुकानापासून ते सोशल मीडियापर्यंत सगळीकडे सुनील कुमार पिंटू हे नाव चर्चेत आहे. २०२३ मध्येही सुनील कुमार पिंटू जेडीयूचे खासदार होत तेव्हाही एक कथित सेक्स स्कँडल व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावेळी या प्रकरणी सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार करण्यात आली होती.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ हा फेक असून तो एआयने बनवण्यात आला आहे. मी याबाबत तक्रार केली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे अशी प्रतिक्रिया सुनील कुमार पिंटू यांनी दिली आहे. दुसरीकडे आम्हाला या व्हिडिओची माहिती मिळाली आहे. उमेदवाराकडून औपचारिकपणे तक्रार आली नाही परंतु पोलीस आपल्या पातळीवर याचा तपास करत आहे असं सायबर शाखेचे डीसीपी आलोक कुमार यांनी सांगितले.