बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 23:47 IST2025-11-13T23:46:56+5:302025-11-13T23:47:27+5:30
बिहारमध्ये एकूण ७,४५,२६,८५८ मतदार असून, यापैकी ५ कोटींहून अधिक मतदारांनी आपला हक्क बजावला होता.

बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
बिहार विधानसभा निवडणूक २०२५च्या महासंग्रामाचा अंतिम निकाल शुक्रवार, १४ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. राज्यातील सत्ताधारी कोण आणि विरोधी पक्ष कोण हे ठरवण्यासाठी जवळपास ५ कोटी मतदारांनी दिलेला कौल उद्या मतमोजणी केंद्रांवर उघडला जाईल. निवडणूक आयोगाने मतमोजणीसाठी व्यापक तयारी केली असून, संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुरक्षा राखण्यासाठी कडक निर्देश जारी केले आहेत.
वेळेचे गणित आणि व्यवस्थापन
बिहार विधानसभेच्या सर्व २४३ जागांसाठी मतमोजणीची सुरुवात सकाळी ८.०० वाजता होईल. नियमानुसार, सर्वप्रथम पोस्टल बॅलेटची अर्थात टपाल मतपत्रिकांची गणना केली जाईल. त्यानंतर, ठीक सकाळी ८.३० वाजल्यापासून ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरू करण्यात येणार आहे. मतदारांनी दिलेली ही जवळपास ५ कोटी मते मोजण्यासाठी आयोगाने संपूर्ण राज्यात तब्बल ४३७२ काउंटिंग टेबलांची व्यवस्था केली आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी एक रिटर्निंग ऑफिसर आणि एक काउंटिंग ऑब्झर्वर तैनात असणार आहे.
पारदर्शकतेसाठी कठोर नियम
मतमोजणी केंद्रांवर पूर्णतः पारदर्शकता राखण्यासाठी आयोग दक्ष आहे. ईव्हीएमच्या मतांची मोजणी करताना प्रत्येक कंट्रोल युनिट टेबलवर आणले जाईल आणि उमेदवारांच्या एजंट्सना त्याची सील आणि सीरियल नंबर पडताळून पाहण्याची संधी दिली जाईल.
महत्त्वाची बाब म्हणजे, जर कोणत्याही बूथमध्ये मतांच्या संख्येत किंवा नोंदीत विसंगती आढळली, तर त्या बूथवरील वीवीपॅट चिठ्ठ्यांची गणना केली जाईल. तसेच, ईव्हीएमची मोजणी संपल्यानंतर प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून ५ मतदान केंद्रांची यादृच्छिक निवड केली जाईल, जिथे उमेदवारांच्या आणि त्यांच्या एजंट्सच्या उपस्थितीत वीवीपॅट चिठ्ठ्यांचा ईव्हीएमच्या निकालांशी ताळमेळ तपासला जाईल. या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक टेबलवर काउंटिंग सुपरवायझर, काउंटिंग असिस्टंट आणि मायक्रो ऑब्झर्वरची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय, उमेदवारांनी नियुक्त केलेले १८,००० हून अधिक काउंटिंग एजंट प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवणार आहेत.
मतदानाचा विक्रम मोडला!
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यांत मतदान झाले होते. या निवडणुकीत मतदानाचा नवा विक्रम नोंदवला गेला. दोन्ही टप्प्यांत मिळून तब्बल ६७.१३ टक्के विक्रमी मतदान झाले. बिहारमध्ये एकूण ७,४५,२६,८५८ मतदार असून, यापैकी ५ कोटींहून अधिक मतदारांनी आपला हक्क बजावला होता. आता या विक्रमी मतदानाचा कौल कोणाच्या बाजूने जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.