चातुर्य ठरले भारी, नितीश कुमारांच्या विजयामागची ४ महत्त्वाची कारणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 08:58 IST2025-11-15T08:58:24+5:302025-11-15T08:58:45+5:30
Bihar Assembly Election Result: नितीश कुमारांच्या विजयामागची ४ महत्त्वाची कारणे खालील प्रमाणे आहेत.

चातुर्य ठरले भारी, नितीश कुमारांच्या विजयामागची ४ महत्त्वाची कारणे
नितीश कुमारांच्या विजयामागची ४ महत्त्वाची कारणे खालील प्रमाणे आहेत.
मोदींची लोकप्रिय प्रतिमा व ‘कट्टा सरकार’चा आरोप
प्रचार ऐनभरात आला असताना पंतप्रधान मोदींनी ‘दस हजारी चुनाव हैं, दुसरी तरफ कट्टा सरकार हैं’, ‘कट्टा, दुनाली, रंगदारी’ असे आरोप राजदवर केले व निवडणूक प्रचारातील मुख्य मुद्दे बाजूला पडले. या आरोपामुळे नितीश कुमार विरुद्ध लालू प्रसाद यादव अशा इतिहासाची उजळणी मतदारांपुढे होऊ लागली. अर्थात याची उत्तरे राजदकडे नव्हती. मोदींचा बिहार प्रचारही निर्णायकी ठरला. त्यांच्या सभांना गर्दीही होती. ते आजही लोकप्रिय असल्याचे दिसून आले.
अडीच हजार रुपये विरुद्ध १० हजार रुपयांचा खेळ
नितीश कुमार यांनी सुमारे १ कोटी ३० लाख महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी १० हजार रुपये जमा केले. तर तेजस्वी यांनी सत्तेवर आल्यावर २५०० रुपये देण्याचे वचन दिले होते. मात्र महिलांनी सरकारकडून आश्वासनाची झालेली पूर्ती पाहिली आणि नितीश कुमार यांच्या बाजूने त्या भक्कमपणे उभ्या राहिल्या. या निवडणुकांत महिलांचे मतदान सर्वाधिक झाले ते या कारणाने. ‘जंगल राज’मध्ये महिलांचा बळी जातो ही समज महिलांनी दाखविली.
सव्वाशे युनिट मोफत वीज, वृद्धांच्या पेन्शनमध्ये वाढ
एनडीएने राज्यात प्रत्येक कुटुंबाला सव्वाशे युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन गेमचेंजर ठरले. या आश्वासनामुळे संपूर्ण ग्रामीण बिहार नितीश कुमार यांच्या मागे एकवटला. ‘हमारे गाँव मे तो भैंस भी पंखे के नीचे सोती हैं’, असे लोक गमतीने म्हणू लागले. वृद्धांच्या पेन्शनमध्ये ४०० रुपयांवरून एकदम ११०० रुपयांपर्यंत केलेली वाढही महत्त्वाचा घटक होता. बिहारमधील वयोवृद्ध नितीश कुमार यांच्या राजकीय चातुर्याला सलाम देताना दिसले. आम्हाला निवृत्त झालेले नितीश कुमार नको, अशी वृद्धांमधील एकूण भावना होती.
महाआघाडीकडे आश्वासने होती; पण सत्ता नव्हती
नितीश कुमार यांच्याकडे सत्ता असल्याने त्यांनी आश्वासने देताना लोकांच्या बँक खात्यात थेट पैसाही टाकला. त्यामुळे केवळ आश्वासने नाहीत तर त्याची पूर्तता आमचे सरकार करते, असा सरळ संदेश लोकांमध्ये गेला. महाआघाडीकडे मात्र कोणताही असा ट्रॅक रेकॉर्ड नसल्याने ते प्रचारात आम्ही सत्तेवर आले की नोकऱ्या देऊ, तुमचे भले करू, असे म्हणत बसले याकडे जनतेने दुर्लक्ष केले.