चिराग पासवान यांची हनुमान उडी : जागांसाठी नडून बसले... निवडणुकीत दमदार विजय मिळवत स्वतःला सिद्धही केले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 08:47 IST2025-11-15T08:47:01+5:302025-11-15T08:47:25+5:30
Bihar Assembly Election Result 2025: बिहारच्या विधानसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री व लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) म्हणजेच एलजेपी या पक्षाचे प्रमुख चिराग पासवान यांनी २९ जागा मिळविण्यासाठी भाजप, जनता दल (यू) पक्षाबरोबर खूप वाटाघाटी केल्या होत्या. त्यातील १९ जागा या पक्षाने आतापर्यंत जिंकल्या आहेत.

चिराग पासवान यांची हनुमान उडी : जागांसाठी नडून बसले... निवडणुकीत दमदार विजय मिळवत स्वतःला सिद्धही केले...
पाटणा - बिहारच्या विधानसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री व लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) म्हणजेच एलजेपी या पक्षाचे प्रमुख चिराग पासवान यांनी २९ जागा मिळविण्यासाठी भाजप, जनता दल (यू) पक्षाबरोबर खूप वाटाघाटी केल्या होत्या. त्यातील १९ जागा या पक्षाने आतापर्यंत जिंकल्या आहेत. या निवडणुका एनडीएच्या विजयासाठी आणि जनता दल (यू)चे प्रमुख नितीशकुमार आणि पंतप्रधान मोदी यांच्या प्रभावी जोडीसाठी लक्षात राहतील. मात्र, चिराग पासवानने स्वतःची राजकीय ओळख या निवडणुकांतून अधिक मजबूत केली आहे. (वृत्तसंस्था)
काकांनी पक्ष फोडला, पण चिरागनी हार मानली नाही
२०२०च्या विधानसभा निवडणुकांनंतर हा पक्ष जवळजवळ संपल्याचे मानले जात होते. सन २०२१मध्ये चिराग यांच्या काकांनी - पशुपतीकुमार पारस यांनी रामविलास पासवान यांच्या वारशावर दावेदारी करत पक्ष फोडला. मात्र, त्यानंतर चिराग पासवान खऱ्या अर्थाने अधिक सक्रिय झाले. या मेहनतीचे फळ लोकसभा आणि आता विधानसभेतही मिळाले. रामविलास पासवान यांची परंपरा पुढे नेण्याचा करिष्मा त्यांचे पुत्र चिराग यांच्याकडे नाही, असे मत त्यांनी आता खोडून काढले आहेत.
लोक जनशक्ती पार्टीचा स्ट्राइक रेट कसा राहिला?
६९% विधानसभा निवडणूक - २९ पैकी १९ जागा जिंकल्या.
१००% लोकसभा निवडणूक - २०२४ लोकसभा निवडणुकांमध्ये चिराग आणि त्यांच्या पक्षाने लढवलेल्या पाचही जागा जिंकल्या होत्या.
चिराग पासवान यांचे राजकीय डावपेच यशस्वी
एनडीएतील भाजपा आणि जनता दल (यू) हे प्रमुख पक्ष विधानसभा निवडणुकांसाठी बिहारच्या २४३ जागांपैकी २०पेक्षा अधिक जागा एलजेपीला देण्यास तयार नव्हते. चिराग पासवान यांनी राजकीय डावपेच म्हणून प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ पक्षाशी चर्चा सुरू केली.
त्यामुळे अखेर भाजप, जनता दल (यू)ने चिराग पासवान यांना विधानसभेच्या २९ जागा दिल्या. चिराग यांनी आपल्या पक्षाला त्यांच्या नेतृत्त्वाखालील उत्तम विजय मिळवून दिला.