बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 06:42 IST2025-11-11T06:42:23+5:302025-11-11T06:42:42+5:30
Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज मंगळवारी २० जिल्ह्यांतील १२२ मतदारसंघांत मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून, सुमारे ४ लाख सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत. ३.७ कोटी मतदार या मतदारसंघांतील १,३०२ उमेदवारांचे भवितव्य ठरवतील.

बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
- एस. पी. सिन्हा
पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज मंगळवारी २० जिल्ह्यांतील १२२ मतदारसंघांत मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून, सुमारे ४ लाख सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत. ३.७ कोटी मतदार या मतदारसंघांतील १,३०२ उमेदवारांचे भवितव्य ठरवतील.
या मतदानासाठी ४५,३९९ केंद्र उभारण्यात आली असून, यातील ४०,०७३ केंद्र ग्रामीण भागात आहेत. या भागात सुरक्षेच्या दृष्टीने ६० हजार राज्य पोलिस, राखीव दलाचे २ हजार जवान, विशेष सशस्त्र दलाचे ३० हजार जवान, २० हजार होमगार्ड आणि इतर प्रशिक्षणार्थी जवान सज्ज आहेत.
‘विरोधक संपून जातील’
१४ नोव्हेंबरला निकाल जाहीर होण्यापूर्वी बिहार भाजपचे निवडणूक प्रभारी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या निवडणुकीत विरोधी पक्ष संपून जाईल, असा दावा केला. नितीशकुमार आणि मोदी सरकारने बिहारसाठी केलेल्या कामाची पावती जनता देणार असून बिहारच्या नशिबात खूप काही चांगले लिहिलेले असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘आयोगावर बाह्य नियंत्रण’
पाटणा : निवडणूक आयोग केंद्रीय नेत्यांच्या प्रभावाखाली कार्यरत असून आयोगावर ‘बाहेरच्या’ शक्तींचे नियंत्रण असल्याचा आरोप राजद नेते तेजस्वी यादव यांनी सोमवारी केला. आयोगाने विक्रमी मतदान करणाऱ्यांत महिला, पुरुष किती आहेत ही आकडेवारी जाहीर केली नसल्याचा आरोप त्यांनी केला.
यंदाच्या निवडणुकीची वैशिष्ट्ये नेमकी काय?
यंदा प्रथमच निवडणूक ड्यूटीवर असलेल्या सुरक्षा जवानांना एकाही मतदान केंद्रावर हेलिकॉप्टरने उतरवण्याची वेळ आली नाही. ग्रामीण भागातील सुधारलेले रस्ते आणि पायाभूत सुविधांमुळे रस्ते मार्गांचाच अधिक वापर झाला.
माओवादी कारवायांत प्रचंड घट झाल्याने प्रथमच एखादे मतदान केंद्र इतरत्र हलवण्याची गरज पडली नाही. या पहिल्या टप्प्यात कुठे हिंसाचाराची एकही घटना घडली नाही. १२२ मतदारसंघांत पुरेसा पोलिस फौजफाटा तैनात आहे.