बिहार निवडणूक २०२५: १२१ मतदारसंघांत एकूण १,३१४ उमेदवार; महिला मतदारांच्या आधारे ‘जदयु’ बळकट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 06:10 IST2025-10-22T06:07:54+5:302025-10-22T06:10:56+5:30
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी संपली.

बिहार निवडणूक २०२५: १२१ मतदारसंघांत एकूण १,३१४ उमेदवार; महिला मतदारांच्या आधारे ‘जदयु’ बळकट
एस. पी. सिन्हा, लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी संपली. त्यानंतर १८ जिल्ह्यांमधील १२१ विधानसभा मतदारसंघांत उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले. यानुसार १,३१४ उमेदवार आता रिंगणात आहेत.
पहिल्या टप्प्यात ६ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, १७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत होती, तर १८ ऑक्टोबर रोजी छाननी झाली. १० ऑक्टोबर रोजी अधिसूचना निघताच उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली होती. पहिल्या टप्प्यासाठी ६ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या पहिल्या टप्प्यासाठी १,६९० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १,३७५ वैध ठरले.
३१५ उमेदवारांचे अर्ज रद्द
३१५ उमेदवारांचे अर्ज रद्द करण्यात आले. ६१ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर १,३१४ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये एकूण ७.४३ कोटी मतदार आहेत. यात अंदाजे ३.९२ कोटी पुरुष, तर ३.५ कोटी महिला तसेच १,७२५ ट्रान्सजेंडर मतदार आहेत. विधानसभेच्या एकूण २४३ जागांपैकी पहिल्या टप्प्यात १२१, तर दुसऱ्या टप्प्यात १२२ जागांसाठी मतदान होणार आहे.
बिहारमध्ये महिला मतदारांच्या आधारे ‘जदयु’ बळकट
२० वर्षांपासून बिहारवर राज्य करणारे नितीशकुमार आजही कोणत्याच पक्षांसाठी ‘परके’ नाहीत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणीत एनडीए सत्ता मिळवण्यात यशस्वी ठरली तर नितीशकुमार मुख्यमंत्री होणार नाहीत, अशी चर्चा राजकीय क्षेत्रात आहे.
मुख्यमंत्रिपदासाठी कोणता चेहरा असेल यावर भाजप किंवा चिराग पासवान यांनी अद्याप कोणतेही जाहीर भाष्य केलेले नाही. ‘हम’ व उपेंद्र कुशवाह यांचा पक्ष नितीश यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे दिसत आहे.
महिला मतदार लक्ष्य
२४३ पैकी १०१ जागा लढवत असलेल्या जदयुला यंदा २०२०च्या निवडणुकीपेक्षाही अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. महिलांच्या खात्यात निवडणुकीपूर्वी प्रत्येकी १० हजार रुपये जमा झाले आहेत. हे श्रेय जदयुला जाईल. त्यामुळे जदयुने ६० ते ७० जागा जिंकल्या तर भाजपकडे नितीश यांच्याशिवाय पर्यायच नाही.