१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 11:19 IST2025-11-10T11:18:21+5:302025-11-10T11:19:56+5:30
Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार रविवारी सायंकाळी ५ वाजता थांबला. उद्या, ११ नोव्हेंबर रोजी मतदान होत असून, १४ रोजी मतमोजणी होईल. या टप्प्यात २० जिल्ह्यांतील १२२ जागांसाठी मतदान होत आहे. यात १३०२ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद होईल.

१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
- एस. पी. सिन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार रविवारी सायंकाळी ५ वाजता थांबला. उद्या, ११ नोव्हेंबर रोजी मतदान होत असून, १४ रोजी मतमोजणी होईल. या टप्प्यात २० जिल्ह्यांतील १२२ जागांसाठी मतदान होत आहे. यात १३०२ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद होईल. यात नऊ विद्यमान मंत्री, १५ माजी मंत्री आणि अनेक राजकीय पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांचा समावेश आहे.
माजी केंद्रीय मंत्री व आरएलएमचे नेते उपेंद्र कुशवाह यांच्या पत्नी स्नेहलता, एचएएम (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे प्रमुख व केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी यांच्या सून दीपा कुमारी या टप्प्यात निवडणूक रिंगणात आहेत. या टप्प्यात ३७,०१३,५५६ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. एकूण ४५,३९९ बुथ उभारण्यात आले असून, त्यापैकी ४०,०७३ ग्रामीण भागात आणि ५,३२६ शहरी भागात आहेत.
अशी आहे उमेदवारांची संख्या
दुसऱ्या टप्प्यात राजदचे ७२, काँग्रेस ३७, व्हीआयपी १०, सीपीआय-एमएल ५, सीपीआयचे ४ आणि सीपीआयचे (एम) २ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. दुसरीकडे भाजप प्रणीत एनडीएत भाजपचे ५२, जदयू ४५, एलजेपी (रामविलास) १५, 'हम'चे ६ आणि आरएलएसपीचे ४ उमेदवार रिंगणात आहेत.
महिलांच्या मतदानाबाबत उत्सुकता
पहिल्या टप्प्यात आतापर्यंतचे सर्वाधिक ६५.०८ टक्के मतदान झाले होते. यात महिलांचे ६९.०४ टक्के, तर पुरुषांचे मतदान ६१.५६ टक्के होते. महिलांच्या मतदानाचे हे प्रमाण दुसऱ्या टप्प्यात कसे राहील, याबाबत राजकीय क्षेत्रात प्रचंड उत्सुकता आहे.
विरोधकांना घुसखोरांचा कॉरिडॉर करायचेय : शाह
इंडिया आघाडी बिहारला घुसखोरांचा कॉरिडॉर करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करून दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी या राज्यात औद्योगिक कॉरिडॉर उभारत असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी सासाराम आणि अरवल येथील जाहीर सभेत सांगितले.
भविष्यात पाकिस्तानवर जे तोफगोळे डागले जातील तेबिहारच्या कारखान्यात तयार होतील, असे सांगितले. काँग्रेस नेते राहुल गांधी व तेजस्वी यादव यांनी 'वोटर अधिकार यात्रा' काढल्याचे सांगून ही यात्रा घुसखोरांच्या रक्षणार्थ होती, अशी टीका शाह यांनी केली.