बिहार विधानसभेची निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून, आता उमेदवारी अर्जांची छाननी सुरू झाली आहे. यादरम्यान, राज्यातील सत्ताधारी असलेल्या एनडीएला एक मोठा धक्का बसला आहे. एनडीएतील एक घटक पक्ष असलेल्या लोकजनशक्ती पार्टी रामविलास या पक्षाच्या एका महिला उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. त्यामुळे एनडीएला मतदानापूर्वीच एक जागा गमवावी लागली आहे. आता राज्यातील २४३ विधानसभा मतदारसंघांपैकी २४२ मतदारसंघात एनडीएचं आव्हान उरलं आहे.
बिहारमधील छपरा जिल्ह्यातील मढौरा विधानसभा मतदारसंघातील ४ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. अर्ज बाद झालेल्या उमेदवारांमध्ये एनडीएमधील चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टी रामविलास या पक्षाच्या उमेदवार सीमा सिंह यांचाही समावेश आहे. सीमा सिंह यांच्या उमेदवारी अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज बाद केला आहे. सीमा सिंह यांच्या व्यतिरिक्त अल्ताफ अहमद राजू, अपक्ष उमेदवार विशाल आणि बसपाचे उमेदवार आदित्य यांचाही उमेदवारी अर्ज बाद झाला आहे.
मढौरा विधानसभा मतदारसंघामध्ये पहिल्या टप्प्यात म्हणजेच ६ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात एकूण १२१ जागांवर मतदारन होणार असून, त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही १७ ऑक्टोबर होती. त्यामुळे आता या मतदारसंघात महाआघाडी आणि जनसुराज्य या दोन पक्षांमध्येच लढत उरली आहे. तसेच त्यात महाआघाडीच्या उमेदवाराचा विजय निश्चित मानला जात आहे.
दरम्यान, एनडीएच्या जागावाटपामध्ये चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टी रामविलास या पक्षाच्या वाट्याला २९ जागा आल्या होत्या. मात्र एका जागेवर उमेदवारी अर्ज बाद झाल्याने आता केवळ २८ जागांवर त्यांचे उमेदवार उरले आहेत.
Web Summary : NDA suffered a setback in Bihar as LJP candidate's nomination was rejected. This reduces their contested seats to 242 out of 243. The error occurred in Madhaura, favoring Mahagathbandhan.
Web Summary : बिहार में एनडीए को झटका लगा, लोजपा उम्मीदवार का नामांकन रद्द। अब वे 243 में से 242 सीटों पर चुनाव लड़ेंगे। मढ़ौरा में हुई गलती से महागठबंधन को फायदा।