Bihar Assembly Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आज लागले. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, NDA 190+ जागांसह सत्तेत दमदार पुनरागमन करत आहे, तर महाआघाडीला 50 पेक्षा कमी जागा मिळत आहेत. राज्यात परिवर्तन होण्याचा दावा करणाऱ्या विरोधकांसाठी हा निकाल मोठा धक्का मानला जातोय. विशेष म्हणजे, महाआघाडीत काँग्रेसने सर्वात खराब कामगिरी केली आहे.
राहुलचा हायड्रोजन बॉम्ब महाआघाडीवर फुटला
सत्तेवर पुनरागमन करण्याचे स्वप्न पाहणारे राजद नेते तेजस्वी यादव यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या निवडणुकीत 74 जागांवर विजय मिळवणाऱ्या राजदला यंदा अर्ध्याहून कमी जागा मिळताना दिसत आहेत. तर, 60 पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवणारी काँग्रेस केवळ 4 जागांवर आघाडीवर आहे. निवडणूक प्रचाराच्या वेळी जागांसाठी सर्वाधिक दबाव टाकणाऱ्या काँग्रेसची ही दयनीय कामगिरी महाआघाडीच्या निकालावर थेट परिणाम करताना दिसत आहे.
2020 मध्ये 70 सीटांवर लढून काँग्रेसने 19 जागा जिंकल्या होत्या. मात्र, यंदा त्यांचा लक्षणीयरित्या घसरला आहे. विशेष म्हणजे, मतदानापूर्वी भाजपवर हायड्रोजन बॉम्ब फोडणाऱ्या राहुल गांधींसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय. त्यांनी राज्यात मतदार अधिकार यात्रेतून भाजपविरोधात वातावरण होते, मात्र निकाल त्यांच्याच विरोधात आले. त्यांचा हायड्रोजन बॉम्ब भाजपऐवजी काँग्रेसवर फुटला. राजदलाही त्याचा जोरदार फटका बसला आहे.
महाआघाडीच्या अपयशाची 5 मोठी कारणे
1) जागा वाटपावरुन मतभेद
महाआघाडीत जागावाटपावरुन शेवटच्या क्षणापर्यंत तणाव सुरू होता. समन्वयाचा अभाव इतका होता की, 12 जागांवर फ्रेंडली फाइट होण्याची वेळ आली. याचा थेट परिणाम सामूहिक मतांवर झाला.
2) तेजस्वी यादवांना सीएम फेस मान्य करण्यात काँग्रेसचा नकार
काँग्रेसला योग्य प्रमाणात जागा न मिळाल्याने पक्षातील नेते नाराज होते. याच पार्श्वभूमीवर तेजस्वी यादवांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून सार्वजनिकरित्या मान्य करण्याबाबत काँग्रेस सतत दुविधेत होती. राहुल गांधींनीही या बाबत मंचावर काहीही न बोलल्याने एकोप्याविषयी शंका निर्माण झाली होती.
3) राहुल गांधींची प्रचारातील मर्यादित उपस्थिती
राहुल गांधी प्रचारात विशेष सक्रिय दिसले नाहीत. त्यांनी मत चोरीचा मुद्दा उचलण्याचा प्रयत्न केला, पण तो जनतेत फारसा प्रभाव निर्माण करू शकला नाही; कारण तो स्थानिक किंवा भावनिक मुद्दा नव्हता.
4) एनडीए सरकारच्या योजनांना मिळालेले जनसमर्थन
बिहारमधील महिलांना मिळालेल्या 10 हजार रुपयांच्या थेट लाभाने एनडीएला मोठा फायदा झाला. सरकारच्या शेवटच्या महिन्यांतील कल्याणकारी योजनांनी थेट तळागाळात प्रभाव निर्माण केला आणि मतदानाची दिशा बदलली.
5) काँग्रेसला सहयोगी पक्षांचे मत आकर्षित करण्यात अपयश
सीमांचलमधील काही जागा वगळता काँग्रेस इतर प्रदेशात सहयोगी पक्षांचे पारंपरिक मत आकर्षित करण्यात अयशस्वी ठरली. गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या अनेक जागांवरही तिची कामगिरी या वेळी अत्यंत खराब दिसत आहे.
Web Summary : NDA triumphs in Bihar; Congress's poor performance and internal discord within the Mahagathbandhan led to their defeat. Rahul Gandhi's campaign failed to resonate, while NDA's welfare schemes proved popular. Seat allocation disputes and lack of CM face consensus further hurt the opposition alliance.
Web Summary : बिहार में एनडीए की जीत; कांग्रेस का खराब प्रदर्शन और महागठबंधन में आंतरिक कलह हार का कारण बने। राहुल गांधी का अभियान विफल रहा, जबकि एनडीए की कल्याणकारी योजनाएँ लोकप्रिय साबित हुईं। सीट बंटवारे में विवाद और सीएम चेहरे पर सहमति की कमी से विपक्षी गठबंधन को नुकसान हुआ।