एस. पी. सिन्हा, पत्रकार व राजकीय विश्लेषक
बिहारमधील २४३ विधानसभा जागांसाठी रणशिंग फुंकले गेले असून, निवडणुकीच्या रणांगणात सर्व उमेदवारांनी आपापली ताकद पणाला लावण्यास सुरुवात केली आहे. येथे दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार असून, पहिल्या टप्प्यात ६ नोव्हेंबर, तर दुसऱ्या टप्प्यात ११ नोव्हेंबर रोजी मतदान होईल. १४ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत मुख्य लढत सत्ताधारी एनडीए (जदयू, भाजप, हम, रालोमो) आणि महागठबंधन (राजद, काँग्रेस, डावे पक्ष आणि व्हीआयपी) यांच्यात आहे. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आपल्या ‘जनसुराज’ पक्षाद्वारे या लढती तिरंगी करण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, त्यांचा जनतेमध्ये अद्याप फारसा प्रभाव जाणवत नाही.
एकीकडे एनडीए सत्ता टिकवण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी उतरली आहे, तर दुसरीकडे महागठबंधनने देखील नितीश सरकारला सत्तेवरून हटवण्यासाठी कंबर कसली आहे. बेरोजगारी, स्थलांतर, कायदा-सुव्यवस्था आदी मुद्दे घेऊन महागठबंधन नितीशकुमार सरकारवर टीकेची झोड उठवत आहे. त्याचवेळी, एनडीए लालू-राबडी युगातील 'जंगलराज'ची जनतेला आठवण करून देत आहे. त्या कालावधीतील भीषण गोष्टी वडीलधाऱ्या लोकांनी युवा पिढीला सांगाव्या, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
लालू-राबडी यांच्या सत्ताकाळातील अनेक वाईट गोष्टींच्या आठवणी लोकांच्या मनात जाग्या होऊन ते राजदला पाठिंबा देणार नाहीत हा दृष्टिकोन मोदींच्या वक्तव्यामागे आहे. मात्र, राजदचे प्रमुख तेजस्वी यादव यांच्याबद्दल तरुणांमध्ये मोठे आकर्षण आहे हाही मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे.
तरुणांचे काय सांगणे आहे?
पाटणा विद्यापीठातील विद्यार्थी उमेशकुमार यांनी सांगितले की, तेजस्वी यादव व प्रशांत किशोर हे रोजगाराच्या मुद्द्यावर आवाज उठवत आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काढलेल्या ‘वोटर अधिकार यात्रा’मुळे काँग्रेसच्या प्रचारात चैतन्य आले. मात्र, काँग्रेस राजदसोबत असल्यामुळे राहुल गांधी यांच्याबद्दल बिहारमधील युवा पिढीला काय वाटते याबद्दल अजून चित्र स्पष्ट झालेले नाही.
भाजपसाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक
भाजपने ही निवडणूक आपल्यासाठी प्रतिष्ठेचा विषय बनवली आहे. ४० स्टार प्रचारक, विविध राज्यांतील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार यांना प्रचारासाठी पाचारण केले आहे. भाजपचे नेते प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाऊन प्रचार करत आहेत.
काँग्रेस पुन्हा आपली ताकद दाखवणार?
बिहारमध्ये काँग्रेस पक्ष आपली ताकद दाखविण्यासाठी सज्ज झाला आहे. मागील काही निवडणुकांमध्ये फक्त औपचारिकता म्हणून उमेदवार उभे करत असलेल्या काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकांत चांगले यश मिळविण्यासाठी कंबर कसली आहे. काँग्रेसने आतापर्यंत ४८ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत, त्यापैकी अर्ध्याहून अधिक जागांवर त्यांचा थेट भाजपशी सामना आहे. पहिल्या टप्प्यात २४, तर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित २४ जागांवर ही लढत रंगणार आहे.
नेत्यांचे दावे-प्रतिदावे
संजय झा (जदयू) : जंगलराजच्या काळात घराबाहेर पडायलाही लोक घाबरत असत. ते दिवस लोकांच्या अजूनही लक्षात आहेत. मात्र, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारने उत्तम प्रगती केली आहे.
अरविंद कुमार सिंह (भाजप) : राजदच्या जंगलराजमध्ये लोक हैराण होते. आता बिहार विकासाच्या मार्गावर आहे.
मृत्युंजय तिवारी (राजद) : नितीशकुमार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम नाहीत. नोकरशहा सरकार चालवत आहेत. सत्तापालट होणे गरजेचे असून तेजस्वी यादवच हा बदल घडवू शकतात.
‘माय’ प्लस ‘ए टू झेड’ राजदची रणनीती
राजद ‘माय’ (मुस्लिम-यादव) या समीकरणाबरोबरच सवर्ण मतदारांना (ए टू झेड) आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. तेजस्वी यादव यांनी बेरोजगारीचा मुद्दा लावून धरला असून, महिला आणि तरुण मतदार त्यांच्या केंद्रस्थानी आहेत.
Web Summary : Bihar elections see a fight between NDA and Mahagathbandhan. Key issues include unemployment and law & order. BJP emphasizes past 'jungle raj,' while youth are drawn to Tejashwi Yadav. Congress aims to regain strength.
Web Summary : बिहार चुनाव में एनडीए और महागठबंधन के बीच मुकाबला है। बेरोजगारी और कानून व्यवस्था जैसे मुद्दे अहम हैं। बीजेपी 'जंगल राज' पर जोर दे रही है, जबकि युवा तेजस्वी यादव की ओर आकर्षित हैं। कांग्रेस का लक्ष्य ताकत हासिल करना है।