"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 20:18 IST2025-10-29T20:17:39+5:302025-10-29T20:18:35+5:30
बिहारचे भले नक्सलवाद आणि भ्रष्टाचार पसरवणाऱ्यांकडून होणार नाही. बिहारचे भले केवळ मोदी आणि नितीश बाबूच करू शकतात, असेही शाह यावेळी म्हणाले.

"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
लालूजींना आपल्या मुलाला (तेजस्वी यादव) मुख्यमंत्री बनवायचे आहे. तर सोनिया गांधींची आपल्या मुलाला (राहुल गांधी) पंतप्रधान बनवण्याची इच्छा आहे. पण बिहारमध्ये मुख्यमंत्रीपद खाली नाही आणि दिल्लीत पंतप्रधानपदही खाली नाही. मी दोघांनाही स्पष्टपणे सांगू इच्छितो, आता तुमच्या मुलांचा नंबर लागणार नाही, अशी भविष्यवाणी करत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी, काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्यावर थेट हल्ला चढवला. ते बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मंगळवारी बेगूसराय येथे एका जाहीर सभेला संबोधित करत होते.
राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांना आदरांजली अर्पण करत शहा यांनी भाषणाची सुरुवात केली आणि लालू-राबडी यांच्यावर 'जंगलराज' म्हणत निशाणा साधला. ते म्हणाले, लालू-राबडी यांचे शासन पुन्हा एका नवीन रूपात परतण्याचा प्रयत्न करत आहे. कधीकाळी औद्योगिक जिल्हा असलेला बेगूसराय त्यांच्या राजवटीत गुन्हेगारी आणि अपहरणाचे केंद्र बनला होता. यावेळी, काँग्रेस आणि आरजेडी मतपेटीच्या राजकारणासाठी घुसखोरांचे रक्षक बनले आहेत, असा आरोपही शाह यांनी केला. तसेच, भाजप प्रत्येक घुसखोराला शोधून बाहेर काढेल, असे आश्वासनही दिले.
भ्रष्टाचार आणि राम मंदिर
अमित शहा यांनी काँग्रेस आणि आरजेडीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. ते म्हणाले, "लालू-राबडी राजवटीत चारा घोटाळा, पूर मदत घोटाळा, हॉटेल घोटाळा, प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार झाला. यावेळी त्यांनी राम मंदिराच्या उभारणीचे श्रेय पंतप्रधान मोदींना दिले. गेल्या ७० वर्षांपर्यंत काँग्रेसने काही केले नाही, पण आज अयोध्येत भव्य राम मंदिर उभे आहे, हे मोदीजींमुळेच शक्य झाले, असे शाह म्हणाले.
दरम्यान, जनतेला एनडीएच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन करत, बिहारचे भले नक्सलवाद आणि भ्रष्टाचार पसरवणाऱ्यांकडून होणार नाही. बिहारचे भले केवळ मोदी आणि नितीश बाबूच करू शकतात, असेही शाह यावेळी म्हणाले.