भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 21:17 IST2025-10-11T21:16:34+5:302025-10-11T21:17:21+5:30
Bihar Assembly Election 2025: बिहारमधील सत्ताधारी असलेल्या एनडीएमधील भाजपा आणि संयुक्त जनता दल या मोठ्या पक्षांनी जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी आपल्या काही जागा कमी करून मित्रपक्षांना दिल्या तरी एनडीएमधील जागावाटपाचा तिढा सुटण्याचं नाव घेत नाही आहे.

भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..
बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर आता येथील राजकीय पक्षांच्या आघाड्यांची जुळवाजुळव करण्याच्या कामाला वेग आला आहे. राज्यातील सत्ताधारी असलेल्या एनडीएमधील भाजपा आणि संयुक्त जनता दल या मोठ्या पक्षांनी जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी आपल्या काही जागा कमी करून मित्रपक्षांना दिल्या तरी एनडीएमधील जागावाटपाचा तिढा सुटण्याचं नाव घेत नाही आहे. लढवण्यासाठी जागा कमी आणि भागीदार अधिक अशी परिस्थिती असल्याने एनडीएमधील छोट्या मित्रपक्षांच्या वाट्याला अगदीच मोजक्या जागा येत आहेत. त्यामुळे धुसफूस सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर एनडीएमध्ये बैठकांवर बैठका सुरू असून, आता भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि हम पक्षाचे जीतनराम मांझी यांची बैठक झाली आहे. मात्र या बैठकीनंतरही मांझी यांची नाराजी कायम आहे. तसेच आमच्यासाठी सगळे पर्याय खुले आहेत, असा दावा मांझी यांच्या पक्षाने केला आहे.
या पार्श्वभूमीवर जीतनराम मांझी हे काहीतरी मोठं पाऊल उचलू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. जीतनराम मांजी हे आपल्या पक्षामधील सर्व नेत्यांना फोन करून कुठल्याही परिस्थितीत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याबाबत त्यांचं मत जाणून घेत आहेत. आता एनडीएमध्ये जागावाटपाचा तिढा सुटला नाही तर जीतनराम मांझी हे १५ ते २० जागांवर आपले उमेदवार रिंगणात उतरवू शकतात.
दरम्यान, बिहारमधील जागावाटपाबाबत आज एनडीएची महत्त्वपूर्ण बैठक आज दिल्लीमध्ये झाली. या बैठकीला अमित शाह, भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, बिहार प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल आणि मित्रपक्षांचे नेते उपस्थित होते. दरम्यान, मित्रपक्षांच्या जागांची घोषणी ही रविवारी केली जाऊ शकते, असे भाजपाकडून सांगण्यात येत आहे.
सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार भाजपाचं जेडीयू आणि लोकजनशक्ती पार्टी रामविलाससोबत जागावाटप निश्चित झालं आहे. सद्याच्या फॉर्म्युल्यानुसार जेडीयू १०१ ते १०२ जागांवर लढणार आहे. तर भाजपा जेडीयूपेक्षा एक कमी जागा लढवेल. मात्र मांझी यांच्या हम आणि उपेंद्र कुशवाहा यांच्या पक्षाला जागावाटपात फारच कमी जागा मिळण्याची शक्यता आहे.