Bihar Assembly Election २०२५: या वर्षीच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. यासाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. अशातच, सत्ताधारी भाजप-जेडीयूसाठी एक धक्कादायक आणि चिंतेची बाब समोर आली आहे. एनडीएचा भाग असलेले लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी बिहारमधील २४३ जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. यामुळे भाजप आणि जेडीयूच्या अडचणी वाढवू शकतात.
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी रविवारी छपरा येथील राजेंद्र स्टेडियममध्ये आयोजित 'नव संकल्प महासभे'ला संबोधित करताना सांगितले की, जेव्हा लोक प्रश्न विचारतात की, चिराग पासवान विधानसभा निवडणूक लढवतील का? तर, आज या पवित्र भूमीवरुन मी जाहीर करतो की, मी निवडणूक लढवणार आहे. ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी, प्रत्येक बिहारी कुटुंबासाठी महत्त्वाची आहे. विरोधक त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आमचा पक्ष बिहारमधील २४३ विधानसभा जागांवर निवडणूक लढवेल. चिराग पासवान यांनी दिलेले हे विधान भाजप आणि जेडीयूच्या अडचणी वाढवू शकते.
खेमका हत्येवरुन सरकारला धारेवर धरलेराजधानी पाटणा येथे व्यापारी गोपाल खेमका यांच्या हत्येबद्दल चिराग पासवान यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, सुशासनासाठी ओळखल्या जाणाऱ्या सरकारमध्ये अशा घटना घडत आहेत. ही खरोखर चिंतेची बाब आहे. मी जबाबदारीपासून पळून जाण्याचा प्रयत्न करणार नाही आणि आपल्या सरकारनेही तसे करण्याचा प्रयत्न करू नये. जर एवढी मोठी घटना शहरी भागात उघडपणे घडत असेल, तर ती खूप गंभीर बाब आहे. मी सरकार आणि स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहे. हत्या राजधानी पाटण्यात झाली असो किंवा बिहारच्या दुर्गम गावात, कायदा आणि सुव्यवस्थेसाठी सरकारला जबाबदार धरावे लागेल, असे ते यावेळी म्हणाले.