Bihar Assembly Election 2020: बिहारमधील रालोआमधून पासवान यांच्या पक्षाची गच्छंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 06:44 IST2020-10-07T04:04:13+5:302020-10-07T06:44:12+5:30
Bihar Assembly Election 2020: नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालीच निवडणूक लढवणार -भाजप

Bihar Assembly Election 2020: बिहारमधील रालोआमधून पासवान यांच्या पक्षाची गच्छंती
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांचा जनता दल (यू) १२२ जागांवर तर भाजप १२१ ठिकाणी उमेदवार उभे करणार, अशी घोषणा दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मंगळवारी केली. ही निवडणूक नितीश यांच्या नेतृत्वाखालीच लढवली जाईल आणि बिहारच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत यापुढे राम विलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पाटीर्ला स्थान राहणार नाही, असे भाजप नेत्यांनी यावेळी स्पष्ट केले.
खा चिराग पासवान यांनी आपण नितीश कुमार यांच्या सर्व उमेदवारांविरुद्ध आपले उमेदवार उभे करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांचा पक्ष केंद्रात रालोआमध्ये असून, राम विलास पासवान केंद्रात मंत्रीही आहे. पण खा. चिराग यांनी उघडपणे नितीश यांच्याविरोधी भूमिका घेतल्याने भाजपने बिहारपुरती त्यांच्याशी फारकत घेतली आहे. त्यामुळे पासवान एकटे पडले आहेत. पंतप्रधान मोदी वा भाजपच्या कोणत्याही नेत्याच्या नावाने स्वत:च्या उमेदवारांसाठी त्यांनी मते मागू नयेत, असेही भाजपने खा. चिराग यांना बजावले आहे. नितीश यांनी खा. पासवान यांच्याविषयी बोलण्याचे टाळले. ते म्हणाले की राम विलास पासवान हे आपले मित्र आहेत. त्यांची प्रकृती लवकर चांगली होवो, अशी आपली इच्छा आहे. जनता दल (यू) आपल्या वाट्याच्या १२२ पैकी ७ जागा जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्थान अवाम पाटीर्ला सोडणार आहे.
भाजपही १२१ पैकी काही जागा मुकेश साहनी यांच्या विकासशील इन्सान पाटीर्ला सोडण्यास तयार आहे. त्यासाठी त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न भाजप करीत आहे.
महाआघाडीशी सामना
राज्यात नितीश यांच्या नेतृत्वाखालील रालोआ आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी यांच्या सामना होणार आहे. महाआघाडीत काँग्रेस, कम्युनिस्ट आणि अन्य काही पक्ष आहेत.