Bihar Assembly Election 2020 : Fear of corona in Bihar, large crowds at leaders' campaigns bihar election | बिहारमध्ये कोरोनाची चिंता न् भीती, नेत्यांच्या प्रचारसभांना अलोट गर्दी

बिहारमध्ये कोरोनाची चिंता न् भीती, नेत्यांच्या प्रचारसभांना अलोट गर्दी

ठळक मुद्देराजदचे तेजस्वी यादव, जापचे पप्पू यादव आणि प्लूरल्सच्या पुष्पम प्रिया यांच्याही सभांना मोठी गर्दी होत असून सोशल डिस्टन्सला हरताळ फासला जात आहे.

मुंबई - बिहार विधानसभा निवडणुकीत रालोआच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये १२ सभा घेणार आहेत. पहिली रॅली २३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर, राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून राजद आणि जयदूच्या नेत्यांच्या मोठ्या सभा पार पडत आहेत. लालू प्रसाद यादव यांचे दोन्ही सुपुत्र निवडणुकीत मोठं यश मिळविण्याच्या दृष्टीने प्रचार सभांचं आयोजन करत आहेत. बिहारमधील निवडणुकांचा फिव्हर पाहिल्यानंतर कोरोनाचं कसलंही गांभीर्य ना नेत्यांना, ना जनतेला, अशीच परिस्थिती आहे. 

बिहार निवडणुकांच्या घोषणेपूर्वीच निवडणूक आयोगाने काही गाईडलाईन जारी केली होती. या गाईडलाईनला साईडलाईन करण्यात येत असल्याचं निवडणुकांच्या प्रचार सभांमधून दिसून येतंय. निवडणुकीतील नेत्यांच्या प्रचार सभेला असणारी गर्दी आणि या गर्दीचे नेत्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन प्रसिद्ध होणारे छायाचित्रच सर्वकाही सांगून जातात. केरळमध्ये ओणम सणाच्या सेलिब्रेशनवेळी निष्काळजीपणा केल्याने, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी सांगितलं होतं. मात्र, बिहार निवडणुकांमधील प्रचारांची रणधुमाळी पाहता, कोरोनाचं संकट गडद होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. 

राजदचे तेजस्वी यादव, जापचे पप्पू यादव आणि प्लूरल्सच्या पुष्पम प्रिया यांच्याही सभांना मोठी गर्दी होत असून सोशल डिस्टन्सला हरताळ फासला जात आहे. उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी, तेजस्वी यादव यांसह दिग्गज नेत्यांच्या सभांमधील गर्दी पाहिल्यानंतर, ते कोरोनाला आमंत्रण तर देत नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित होतो. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तब्बल 12 सभा बिहारमध्ये होणार आहेत. त्यामुळे, या सभांना होणाऱ्या गर्दीसाठी प्रशासन नेमकं काय उपाय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

मोदींच्या 12 सभा होणार 

मोदी हे बिहारमध्ये १२ सभा घेतील. २३ आॅक्टोबर रोजी सासाराममध्ये पहिली सभा, दुसरी सभा गयामध्ये, तर तिसरी भागलपूरमध्ये होईल. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदी यांची दरभंगामध्ये रॅली होईल. त्यानंतर मुजफ्फरपूरमध्ये आणि तिसरी रॅली पाटण्यात होईल. १ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी पुन्हा राज्यात येतील.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bihar Assembly Election 2020 : Fear of corona in Bihar, large crowds at leaders' campaigns bihar election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.