महिला पैलवानांना मोठे यश! ब्रिजभूषण सिंह यांच्यावर दोन एफआयआर, त्यात पॉक्सोचाही गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 23:01 IST2023-04-28T23:00:26+5:302023-04-28T23:01:21+5:30
भाजपाचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.

महिला पैलवानांना मोठे यश! ब्रिजभूषण सिंह यांच्यावर दोन एफआयआर, त्यात पॉक्सोचाही गुन्हा दाखल
जंतर मंतरवर धरने आंदोलनाला बसलेल्या महिला पैलवानांच्या तक्रारीवर अखेर कारवाई करण्यात आली आहे. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दिल्लीच्या कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यात दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. यापैकी एक पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपाचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयात दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवण्याचे आश्वासन दिले होते. सरन्यायाधीश न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठासमोर एसजी तुषार मेहता यांनी दिल्ली पोलीस आजच एफआयआर दाखल करतील असे म्हणाले होते.
सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर कुस्तीपटूंनी पत्रकार परिषदेत ब्रिजभूषणला अटक होईपर्यंत आपले आंदोलन संपणार नसल्याचे म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे. ब्रिजभूषण सिंह यांना सर्व पदांवरून काढून टाकावे, ते त्यांच्या पदांचा गैरवापर करू शकतात. आमचा कोणत्याही समिती किंवा समिती सदस्यावर विश्वास नाही, असे विनेश फोगाट म्हणाली होती.