Uttar Pradesh SIR Process: देशातील अनेक राज्यांमध्ये मतदार याद्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रिया सुरू आहे. अनेक ठिकाणी या प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आले आहे. परंतु, या प्रक्रियेत बीएलओंना मोठ्या समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिले. यानंतर उत्तर प्रदेशात या SIR प्रक्रियेत मोठी गडबड झाल्याचे समोर आले आहे. चुकीची माहिती दिल्यामुळे तीन जणांविरोधात FIR दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यात मतदार याद्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) दरम्यान एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. जिल्हा प्रशासनाने पहिल्यांदाच या प्रकरणी कठोर कारवाई केली आहे. निवडणूक प्रक्रियेत खोटी माहिती दिल्याबद्दल परदेशात राहणाऱ्या आई आणि तिच्या दोन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राज्यातील SIR फॉर्ममध्ये खोटी माहिती देण्याचा हा पहिलाच प्रकार आहे आणि थेट FIR नोंदवून जिल्हा प्रशासनाने निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची अनियमितता खपवून घेतली जाणार नाही, असा कडक संदेश दिला आहे.
सादर केलेले मतमोजणी फॉर्म संशयास्पद
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार एसआयआरचे काम पारदर्शकतेने सुरू आहे. विधानसभा मतदारसंघ-३७ रामपूरच्या भाग क्रमांक २४८ मध्ये, बीएलओ मतदारांकडून मतमोजणी फॉर्म गोळा करत होते आणि त्यांचे डिजिटलायझेशन करत होते. या प्रक्रियेदरम्यान मतदार क्रमांक ६४५ आमिर आणि ६४८ दानिश यांच्या नावाने सादर केलेले मतमोजणी फॉर्म संशयास्पद असल्याचे आढळून आले. तपासात असे दिसून आले की, दोघे गेल्या अनेक वर्षांपासून देशाबाहेर राहत आहेत, एक दुबईमध्ये आणि दुसरा कुवेतमध्ये.
नूरजहां, आमिर आणि दानिश या तिघांविरुद्ध एफआयआर दाखल
बीएलओच्या अहवालाच्या आधारे तपास पुढे सरकत असताना, हे स्पष्ट झाले की, मुलांच्या आई नूरजहां यांनी जाणूनबुजून चुकीची माहिती देऊन फॉर्म सादर केले होते. त्यांनी फॉर्मवर मुलांच्या स्वाक्षऱ्याही खोट्या केल्या होत्या. हे निवडणूक कायद्यांचे गंभीर उल्लंघन आहे हे लक्षात घेऊन जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सहाय्यक नोंदणी अधिकाऱ्यांमार्फत नूरजहां, आमिर आणि दानिश या तिघांविरुद्ध एफआयआर दाखल केला.
दरम्यान, एफआयआरनुसार रामपूर विधानसभा मतदारसंघातील एसआयआर मोहिमेशी संबंधित पर्यवेक्षक दिनेश कुमार यांच्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. नूरजहां आणि तिची दोन्ही मुले आमिर खान आणि दानिश खान यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २३७, ३१८(२) आणि लोकप्रतिनिधी कायदा १९५० अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
Web Summary : A major scam in Uttar Pradesh's SIR process exposed. FIR filed against Noorjahan, Aamir, and Danish for providing false information in voter list revision. They submitted fraudulent forms, violating election laws.
Web Summary : उत्तर प्रदेश की एसआईआर प्रक्रिया में बड़ा घोटाला सामने आया। मतदाता सूची संशोधन में गलत जानकारी देने पर नूरजहां, आमिर और दानिश के खिलाफ एफआईआर दर्ज। उन्होंने फर्जी फॉर्म जमा किए, जो चुनाव कानूनों का उल्लंघन है।