पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी देशभरातून तब्बल १२ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस आता या प्रकरणी चौकशी करत असून, या चौकशीतून वेगवेगळे खुलासे होत आहेत. दिल्ली व हरियाणामधून अटक करण्यात आलेले आरोपी अरमान आणि मोहम्मद तारिफ यांनी दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासातील अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवून संवेदनशील माहिती लीक केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी सध्या तपास यंत्रणा विविध अंगांनी चौकशी करत आहेत.
सिम कार्ड खरेदीचा तपास सुरूदोन्ही आरोपींनी ज्या ठिकाणाहून भारतीय सिम कार्ड खरेदी केली होती, त्या दुकानदाराचा शोध सुरक्षा यंत्रणांनी सुरू केला आहे. ओळख पटल्यावर दुकानाच्या नोंदी तपासल्या जातील. प्राथमिक चौकशीत तारिफने कबुली दिली आहे की, पाकिस्तानी अधिकारी आसिफ बलोच आणि जाफर यांच्याशी त्याचा संपर्क केवळ भारतीय नंबरवरून सुरू होता.
व्हॉट्सअॅप कॉलवरून संपर्कपोलिसांच्या माहितीनुसार, हे अधिकारी व्हॉट्सअॅप कॉलद्वारे तारिफशी संवाद साधत होते. त्यामुळे त्यांच्या संभाषणावर नजर ठेवता येणे शक्य नव्हते. तसेच, त्यांच्यात मेसेजेसची देवाणघेवाण देखील फक्त भारतीय नंबरवरून होत होती.
मोबाईल डेटाची तपासणीपोलीस सध्या तारिफच्या फोनमधील डिलीट केलेला डेटा पुन्हा मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. अरमानकडून जप्त केलेले दोन मोबाईलही तपासाअंतर्गत आहेत. त्यांच्या माध्यमातून आणखी पुरावे मिळू शकतात.
सिरसा एअर फोर्स स्टेशनची माहिती लीक?सूत्रांच्या माहितीनुसार, तारिफने कबूल केलं आहे की, पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार त्याने सिरसा हवाई दल तळाची माहिती पाकिस्तानला दिली होती. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर याच माहितचा वापर करून पाकिस्तानकडून त्या तळावर क्षेपणास्त्र डागण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण, भारतीय हवाई संरक्षण प्रणालीने हा हल्ला परतवून लावला.
या प्रकरणात आता लष्करी गुप्तचर यंत्रणा व नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी यांचा सहभाग वाढण्याची शक्यता आहे. आरामन आणि तारिफ, दोघांचीही सखोल चौकशी केली जाणार आहे. तपास यंत्रणांकडून आरोपींच्या सोशल मीडिया खात्यांची तपासणी सुरू आहे. तारिफच्या संपर्कात असलेल्या एका महिलेबद्दलही माहिती मिळाली असून, तिचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
आयएसआयचे नेटवर्क वाढवण्याचे कामतपासातून हे समोर आले आहे की, अरमान आणि तारिफ हे मेवात जिल्ह्यात स्लीपर सेल म्हणून काम करत होते आणि पाकिस्तानच्या आयएसआयसाठी नेटवर्क तयार करत होते. तारिफने कबूल केले आहे की, त्याला पाकिस्तानी व्हिसा हवा असणाऱ्या लोकांची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले होते. सुरक्षा यंत्रणांनी अरमानला हरियाणातील नूहमधील राजाका गावातून अटक केली असून, दुसऱ्या दिवशी तारिफला बावलाजवळील गावातून पकडण्यात आले.