लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 23:05 IST2025-11-11T23:04:28+5:302025-11-11T23:05:02+5:30
दिल्ली-एनसीआर आणि पुलवामा येथील संशयित ठिकाणांवर सुरक्षा यंत्रणांनी सातत्याने छापे टाकले होते. या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्यही हस्तगत करण्यात आले.

लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटाच्या प्राथमिक तपासात अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. तपास यंत्रणांच्या उच्चस्तरीय सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट नियोजित आणि पूर्ण विकसित बॉम्बचा नव्हता, तर सुरक्षा यंत्रणांच्या वाढत्या दबावामुळे आणि आरोपींच्या घाबरलेल्या मनस्थितीमुळे घाईघाईत घडवण्यात आला होता. ९ आणि १० नोव्हेंबर २०२५ रोजी हरियाणातील फरीदाबाद येथे टाकलेल्या छाप्यांमध्ये तब्बल ३००० किलो स्फोटके जप्त झाल्याने आरोपी पूर्णपणे हादरले होते, असे या सूत्रांनी म्हटले आहे.
दिल्ली-एनसीआर आणि पुलवामा येथील संशयित ठिकाणांवर सुरक्षा यंत्रणांनी सातत्याने छापे टाकले होते. या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्यही हस्तगत करण्यात आले. या वाढत्या दबावामुळेच आरोपींनी घाईघाईत आणि तडकाफडकी कृती केल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले आहे.
तीन हजार किलो स्फोटके जप्त
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटाच्या अगदी आधी, ९ आणि १० नोव्हेंबर २०२५ रोजी हरियाणातील फरीदाबाद येथे सुरक्षा दलांनी छापे टाकून जवळपास तीन हजार किलो स्फोटके जप्त केली होती. या साठ्यात डिटोनेटर्स, टायमर्स आणि बॉम्ब बनवण्यासाठी लागणारे इतर साहित्यही होते. फरीदाबादमध्ये झालेली ही मोठी कारवाई आरोपींना जेरबंद करण्याच्या मोहिमेतील निर्णायक टप्पा ठरली, ज्यामुळे त्यांना पुढील मोठ्या स्फोटाची योजना पूर्ण करता आली नाही.
अपूर्ण बॉम्बमुळे स्फोटाचा परिणाम मर्यादित
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लाल किल्ल्याजवळ जो स्फोट घडवण्यात आला, तो बॉम्ब अपूर्ण अवस्थेत होता आणि तो पूर्णपणे विकसित झाला नव्हता. त्यामुळेच या स्फोटाचा परिणाम मर्यादित राहिला. स्फोटामुळे जमिनीवर कोणताही मोठा खड्डा पडला नाही. तसेच, धातूचे तुकडे किंवा इतर गंभीर नुकसान करणाऱ्या वस्तू घटनास्थळी आढळल्या नाहीत.
Top sources to ANI on the Red Fort blast after initial findings:
— ANI (@ANI) November 11, 2025
- Raids by security agencies across multiple locations in Delhi-NCR and Pulwama, recovering significant quantities of explosives, are believed to have led the suspect to act hastily under mounting pressure.
-… pic.twitter.com/2ptNXBN7pv
सुरक्षा यंत्रणांचे यश
देशभरातील सुरक्षा यंत्रणांनी संशयित मॉड्यूल्सवर केलेल्या समन्वित आणि तातडीच्या कारवाईमुळेच आरोपींना हा हल्ला नियोजित पद्धतीने करता आला नाही. या पॅन-इंडिया ॲलर्टमुळेच एक मोठा आणि गंभीर दहशतवादी हल्ला टळला आहे, याचे श्रेय सुरक्षा दलांच्या कार्यक्षमतेला दिले जात आहे.