'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 14:39 IST2025-08-20T14:38:45+5:302025-08-20T14:39:57+5:30
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर गुजरातमधील एका व्यक्तीने हल्ला करत त्यांना जखमी केले.

'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
Rekha Gupta Attack:दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर बुधवारी सकाळी जनसुनावणीदरम्यान हल्ला करण्यात झाला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली आहे. आरोपी गुजरातमधील राजकोटचा रहिवासी आणि प्राणीप्रेमी असल्याचे सांगितले जात आहे. प्राथमिक तपासात आरोपीने आपले नाव राजेशभाई खिमजी भाई साकारिया असे सांगितले आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्याची चौकशी सुरू आहे. त्यानंतर आता या प्रकरणात आरोपी राजेशच्या आईने महत्त्वाचे खुलासे केले आहेत. आरोपी राजेश हा एक ऑटो चालक आहे आणि त्याने अनेक वेळा हिंसक वर्तन केल्याचे समोर आलं आहे.
बुधवारी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जनसुनावणीदरम्यान गुजरातमधील राजेशभाई या व्यक्तीने हल्ला केला. त्याने मुख्यमंत्र्यांवर अनेक वेळा हात उचलला. राजेश खिमजी याने रेखा गुप्ता यांना चापट मारली आणि त्यांचे केसही ओढले. त्याने मुख्यमंत्र्यांना धक्का दिला आणि त्यांना दुखापत करण्याचा प्रयत्न केला. राजेश सुमारे १.२० मिनिटे म्हणजेच ८० सेकंद हल्ला करत राहिला. यादरम्यान, सुरक्षा कर्मचारी त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत राहिले तरीही तो रेखा गुप्तांना मारण्याचा प्रयत्न करत होता.
राजेशभाई खिमजीभाई साकारिया हा राजकोटच्या कोठारिया भागात राहतो आणि रिक्षा चालवतो. या घटनेनंतर राजकोट पोलीस त्याच्या घरी पोहोचले होते. त्याच्या आईने सांगितले की, माझा मुलगा प्राणीप्रेमी आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत कुत्रे पकडण्याचा आदेश दिल्यानंतर तो दुःखी होता. म्हणूनच तो दिल्लीला गेला होता. राजेशभाईची आई राजकोट पोलीस ठाण्यात देखील जाऊन आल्या.
"माझ्या मुलाने कुत्र्यांवर असलेल्या प्रेमापोटी हे केले. मी मुख्यमंत्र्यांना आवाहन करते की आम्ही गरीब लोक आहोत, माझ्या मुलाला माफ करावे. तो महादेवाचा भक्त आहे. मी उज्जैनला जाणार आहे असे सांगून तो घरातून निघाला हो. तो महिन्यातून एकदा तरी तिथे जातो. तो उज्जैनहून दिल्लीला कधी गेला हे मला माहित नाही. काल त्याच्या वडिलांनी त्याला फोन करून विचारले की तो परत कधी येणार आहे. त्याने त्याच्या वडिलांना सांगितले की तो कुत्र्यांसाठी दिल्लीत आहे. हे सांगितल्यानंतर त्याने फोन ठेवला. सोशल मीडियावर दिल्लीतील कुत्र्यांना घेऊन जातानाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो अस्वस्थ झाला होता. ते व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याने काही खाल्ले नाही. तो रिक्षा चालवतो आणि त्याला पत्नी आणि मुलगा आहे," असं साकारियाच्या आईने सांगितले.