इंडिगोला मोठा दिलासा! डीजीसीएने क्रू विश्रांतीचा नियम मागे घेतला, तरीही उड्डाणे सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 14:10 IST2025-12-05T14:09:39+5:302025-12-05T14:10:25+5:30
IndiGo Flight Cancellation Issue: नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, इंडिगोला आलेले हे संकट नवीन 'फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन्स' नियमांच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंमलबजावणीतील चुकीचे नियोजन आणि चुकीच्या अंदाजामुळे आले आहे.

इंडिगोला मोठा दिलासा! डीजीसीएने क्रू विश्रांतीचा नियम मागे घेतला, तरीही उड्डाणे सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागणार
देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो सध्या प्रचंड मोठ्या संकटातून जात आहे. गेल्या दोन दिवसांत या कंपनीची ९०० हून अधिक उड्डाणे रद्द झाली असून, दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, चेन्नई आणि अहमदाबादसह देशातील प्रमुख विमानतळांवर प्रवाशांची मोठी गैरसोय आणि गोंधळ निर्माण झाला आहे.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, इंडिगोला आलेले हे संकट नवीन 'फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन्स' नियमांच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंमलबजावणीतील चुकीचे नियोजन आणि चुकीच्या अंदाजामुळे आले आहे. नवीन नियमांनुसार लागणाऱ्या पायलट आणि क्रू सदस्यांची संख्या कंपनीने चुकीची गृहीत धरल्यामुळे, मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कमतरता निर्माण झाली आणि विमानसेवा ठप्प झाली.
गुरुवारी ५०० हून अधिक आणि शुक्रवारी ४०० हून अधिक उड्डाणे रद्द झाल्यामुळे, प्रवाशांचा संताप अनावर झाला आणि अनेक विमानतळांवर त्यांनी गोंधळ घातला. यात सामान्य प्रवाशांसोबतच सिंगापूरचे भारतातील उच्चायुक्त सायमन वोंग यांच्यासारख्या उच्च-प्रोफाइल व्यक्तींनाही देवघरला जाणारे उड्डाण रद्द झाल्याने मोठा फटका बसला. इंडिगोच्या या गोंधळामुळे इतर विमान कंपन्यांनी अचानक प्रवाशांच्या दरात मोठी वाढ केली आहे, ज्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांची लूट होत आहे.
सरकारचा हस्तक्षेप आणि दिलासा
नागरी उड्डयन मंत्र्यांनी या परिस्थितीचा आढावा घेत DGCA ला इंडिगोच्या नेटवर्कवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, DGCA ने तातडीने क्रू मेंबर्सच्या 'साप्ताहिक विश्रांती'चा नियम तात्काळ प्रभावाने शिथिल करून इंडिगोला तात्पुरता दिलासा दिला आहे. "विविध विमान कंपन्यांकडून मिळालेल्या कामकाजातील अडचणी आणि सूचना लक्षात घेता, मागील निर्देश तात्काळ प्रभावाने मागे घेण्यात येत आहेत," असे डीजीसीएने म्हटले आहे.
तथापि, इंडिगोने DGCA ला कळवले आहे की, या रद्द झालेल्या उड्डाणांचा सिलसिला पुढील दोन ते तीन दिवस सुरूच राहील. बुधवारी झालेल्या बैठकीत इंडिगोला १० फेब्रुवारी २०२६ पर्यंत आपले कामकाज पूर्णपणे सामान्य आणि स्थिर करण्याची सूट देण्यात आली होती. दरम्यान, संसदेतही समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव आणि इतरांनी या गंभीर मुद्द्यावर सरकारला प्रश्न विचारले आहेत.