मोठी बातमी! मोदींच्या हत्येचा कट रशियाने उधळला? अमेरिकेचा एजंट ढाक्यामध्ये मारला गेला, चर्चांना उधाण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 13:33 IST2025-10-25T13:31:39+5:302025-10-25T13:33:14+5:30
PM Narendra Modi assassination Plot news: पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी चीनमध्ये एकाच कारमधून प्रवास केला होता. या दौऱ्यावरून परतल्यानंतर मोदी यांनी एका कार्यक्रमात मी चीनला गेलेलो म्हणून टाळ्या वाजवताय की, चीनवरून परत आलो म्हणून वाजवताय, असा सवाल केला होता.

मोठी बातमी! मोदींच्या हत्येचा कट रशियाने उधळला? अमेरिकेचा एजंट ढाक्यामध्ये मारला गेला, चर्चांना उधाण...
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएने रचल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. हा कट रशियाच्या मदतीने उधळून लावण्यात भारतीय सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे. बांगलादेशची राजधानी ढाका येथील एका अमेरिकन राजनैतिक अधिकाऱ्याच्या 'रहस्यमय' मृत्यूवरून हा दावा करण्यात येत असून यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे.
पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी चीनमध्ये एकाच कारमधून प्रवास केला होता. या दौऱ्यावरून परतल्यानंतर मोदी यांनी एका कार्यक्रमात मी चीनला गेलेलो म्हणून टाळ्या वाजवताय की, चीनवरून परत आलो म्हणून वाजवताय, असा सवाल केला होता. मोदी यांच्या अशा वक्तव्याने सर्वांच्याच मनात संशयाची पाल चुकचुकली होती. यावरून आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ञांनी मोठ्या आंतरराष्ट्रीय षडयंत्राची शक्यता व्यक्त करत एकेक कडी जोडली आहे.
टेरेन्स जॅक्सन हा अमेरिकेचा महत्वाचा अधिकारी जो यापूर्वीच्या अमेरिकेच्या परदेशांतील सर्व ऑपरेशन्सचा प्रमुख चेहरा होता, त्याचा ३१ ऑगस्टला ढाक्यातील एका हॉटेलमध्ये मृत्यू झाला होता. जॅक्सनचा मृत्यू या कटाशी संबंधित असू शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. ऑर्गनायझर या वृत्तपत्राने हा खळबळजनक दावा केला आहे.
रशियाची गुप्त माहिती
या वृत्तानुसार, पंतप्रधान मोदींना लक्ष्य करण्याचा 'सीआयए'चा कट होता. पण, भारताच्या विश्वासू मित्र असलेल्या रशियाने गुप्त माहिती पुरवून भारताला वेळीच सावध केले. रशियाकडून मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारे भारतीय सुरक्षा दलांनी तातडीने कारवाई करत हा मोठा कट उधळून लावला.
जॅक्सनला बांगलादेशात सेंट मार्टिन बेटावर बांगलादेश सैन्याला प्रशिक्षण देण्यासाठी तैनात करण्यात आले होते, असे सांगितले जात असले तरी त्याचा मूळ उद्देश वेगळाच होता. ज्या दिवशी जॅक्सन मृतावस्थेत सापडला त्याच दिवशी मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी चीनमधील तियानजिन येथे होते. तिथे पुतीन आणि मोदी हे एकाच कारने प्रवास करत होते. तर २ सप्टेंबरला मोदींनी दिल्लीत टाळ्यांवरून वक्तव्य केले होते. विश्लेषकांच्या मते, पंतप्रधान मोदींच्या या गूढ विधानांमुळे एक गंभीर संदेश मिळत आहे.