२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 09:21 IST2025-11-13T09:07:35+5:302025-11-13T09:21:23+5:30
दिल्ली झालेल्या कार स्फोटानंतर तपासादरम्यान धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
Delhi Blast: लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण कार स्फोटाच्या तपासामध्ये तपास यंत्रणांच्या हाती धक्कादायक माहिती लागली आहे. या स्फोटामागील 'व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल'मधील मुख्य आरोपी डॉक्टर उमर नबी याच्यासह डॉ. मुझम्मिल, डॉ. आदिल आणि शाहीन यांनी मिळून तब्बल २० लाख रुपये रोख स्वरूपात जमा केले होते, अशी माहिती तपास यंत्रणांच्या सूत्रांनी दिली आहे. तसेच आठ संशयितांनी चार शहरांमध्ये साखळी स्फोट घडवून आणण्याची भयावह योजना आखली होती.
दिल्ली बॉम्बस्फोटात आणखी एक नवीन खुलासा समोर आला आहे. लाल किल्ला स्फोटातील आरोपी डॉ. मुझम्मिल, डॉ. आदिल, उमर आणि शाहीन यांनी मिळून अंदाजे २० लाख रुपये रोख जमा केले, जे उमरला देण्यात आले. हा पैसा जमा झाल्यानंतर, या दहशतवाद्यांनी स्फोटकं तयार करण्याच्या उद्देशाने गुरुग्राम, नूह आणि आसपासच्या भागातून २० क्विंटलहून अधिक एनपीके खत खरेदी केले. या खताची किंमत सुमारे ३ लाख रुपये होती. एनपीके खताचा उपयोग मोठ्या प्रमाणावर तात्पुरती स्फोटके बनवण्यासाठी केला जातो. इतक्या मोठ्या प्रमाणावर स्फोटके तयार करण्याचा त्यांचा उद्देश पाहता, हे दहशतवादीदिल्ली आणि आसपासच्या प्रदेशात मोठे विध्वंस घडवून आणण्याच्या तयारीत होते, हे स्पष्ट होते.
माध्यमांच्या वृत्तानुसार, या मॉड्यूलमध्ये सामील असलेल्या सुमारे आठ संशयितांनी देशातील चार वेगवेगळ्या शहरांमध्ये साखळी स्फोट घडवून आणण्याची भयावह योजना आखली होती. या योजनेनुसार, त्यांनी दोन-दोन सदस्यांचे गट तयार केले होते आणि हे गट वेगवेगळ्या चार शहरांकडे रवाना होणार होते. प्रत्येक गटाकडे अनेक इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइसेस असणार होते. सुरक्षा यंत्रणांनी वेळीच सूत्रधारांना अटक केल्याने आणि डॉ. उमर नबी स्फोटात मारला गेल्याने ही मोठा घातपात टळला.
Delhi terror blast case | The Red Fort blast accused Dr Muzammil, Dr Adeel, Umar, and Shaheen jointly raised around Rs 20 lakhs in cash, which was handed over to Umar. They later procured more than 20 quintals of NPK Fertiliser worth Rs 3 lakhs from Gurugram, Nuh and nearby areas…
— ANI (@ANI) November 13, 2025
आर्थिक वाद आणि सिग्नल ॲपचा वापर
तपासादरम्यान, आरोपी उमर नबी आणि डॉ. मुझम्मिल यांच्यात पैशांवरून वाद होता, अशी माहितीही समोर आली आहे. याशिवाय, उमर नबीने 'सिग्नल ॲप'वर इतर २ ते ४ सदस्यांसह एक ग्रुप तयार केला होता, ज्याद्वारे ते गुप्तपणे संवाद साधत होते. राष्ट्रीय तपास यंत्रणा या मॉड्यूलच्या आंतरराष्ट्रीय हँडलर आणि त्यांना झालेल्या आर्थिक मदतीचा कसून तपास करत आहे.