हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 13:04 IST2025-11-10T13:04:22+5:302025-11-10T13:04:52+5:30
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानी दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यात हाफिजचे संपूर्ण कुटुंब मारले गेले होते. याचा बदला घेण्यासाठी हाफिजने मोठी तयारी सुरु केली आहे.

हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
नवी दिल्ली: देशावर मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या पाकिस्तानमधीलदहशतवादी संघटनांच्या मोठ्या कटाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली असून पाकिस्तानमध्ये बसलेला दहशतवाद्यांचा म्होरक्या हाफिज सईदबाबत मोठा खुलासा समोर आला आहे. यामुळे सुरक्षा यंत्रणा हाय अलर्ट झाल्या असून पुढील कारवाई सुरु करण्यात आली आहे.
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानी दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यात हाफिजचे संपूर्ण कुटुंब मारले गेले होते. याचा बदला घेण्यासाठी हाफिजने पाकिस्तान नाही तर बांगलादेशचा वापर करण्याचे ठरविले होते. आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी बांगलादेशमध्ये वारंवार ये-जा करत आहेत. त्यांच्या मदतीने हाफिज हा बांगलादेशचा वापर दहशतवाद्यांचे लाँच पॅड म्हणून करण्याची योजना आखत आहे. पाकिस्तानमधील खैरपूर तमेवाली येथील एका रॅलीमध्ये लष्कर-ए-तैयबाचा कमांडर सैफुल्ला सैफ याने हाफिज सईद बांगलादेशला नवा लॉन्चपॅड बनवून भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे उघडपणे सांगितले.
यानंतर केलेल्या चौकशीत सईदने बांगलादेशमध्ये आपल्या एका विश्वासू साथीदाराला पाठवले असून, तो तेथील तरुणांना 'जिहाद'ची चिथावणी देऊन त्यांना कट्टरपंथी बनवत आहे आणि दहशतवादी प्रशिक्षण देत आहे, अशी गोपनीय माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. या मोठ्या कारवाईमुळे देशातील सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून, देशातील संवेदनशील ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
दोन डॉक्टरांकडून काय बाहेर आले...
पोलिसांच्या चौकशीतून एक धक्कादायक खुलासा झाला आहे. पकडण्यात आलेल्या या दोन डॉक्टर दहशतवाद्यांच्या निशाण्यावर दिल्ली, सहारनपूर आणि काश्मीरमधील संवेदनशील ठिकाणे होती. दिल्लीतील आझादपूर मंडईची त्यांनी रेकी केली होती. याशिवाय, देशातील प्रमुख संस्थांपैकी एक असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय बॉम्बस्फोटाने उडवण्याचा गंभीर कटही या दहशतवाद्यांनी आखला होता.