From big guns to missiles, India bans import of 101 defense items to boost self reliance | संरक्षण उत्पादनात देश होणार आत्मनिर्भर; १०१ शस्त्रास्त्रांची आयात थांबवली

संरक्षण उत्पादनात देश होणार आत्मनिर्भर; १०१ शस्त्रास्त्रांची आयात थांबवली

- निनाद देशमुख 

पुणे : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी महत्त्वाची घोषणा करत संरक्षण क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी १०१ शस्त्रास्त्रांच्या आयातीवर बंदी घातली. यामुळे ही उत्पादने आता देशातच उत्पादित केली जातील. या निर्णयाचे उद्योजकांसह संरक्षण तज्ज्ञांनी स्वागत केले आहे.

भारताच्या संरक्षण खात्याला मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी संधी देण्यासाठी मेक इन इंडिया अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशी उद्योगांना संधी देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला. आयात बंद केलेल्या १०१ शस्त्रास्त्रात नौदल, वायूदल तसेच लष्कराला लागणाऱ्या महत्त्वाच्या शस्त्रांचा समावेश आहे. भारतीय सशस्त्र दलांनी गेल्या पाच वर्षांत जवळपास ३ लाख कोटींच्या शस्त्रास्त्रांची कंत्राटे दिली होती. हे सर्व शस्त्रे आता देशात बनणार आहेत. यामुळे देशातला पैसा देशात राहणार असून देशी उद्योगाला चालना मिळून रोजगार निर्मितीही होणार आहे.

भारतीय उद्योगांना चालना मिळणार
सामरिक निर्णयामुळे संरक्षण उत्पादनात भारत आत्मनिर्भर होईल. भारतीय संरक्षण उपकरणे आणि उत्पादन उद्योगांना चालना मिळेल. देशांतर्गत उद्योगात विशेषत: एमएसएमई क्षेत्राच्या वाढीमुळे आत्मनिर्भरता वाढेल. आयातीवरील खर्च कमी होईल. परकीय चलनाची बचत होईल. रोजगाराच्या संधी निर्माण होतील. यामुळे भारताचे ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठले जाईल.
-बाबा कल्याणी, सीएमडी, भारत फोर्ज उद्योग समूह

संरक्षण मंत्रालयाने घेतलेला निर्णय खूप महत्त्वाचा असून यामुळे देशी उद्योगांना चालना मिळेल आणि परकीय अवलंबित्व कमी होऊन देशांतर्गत उत्पादन वाढेल.
- निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर

२०१४ मध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेची सुरुवात केली होती. पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर योजनेमुळे याला चालना मिळणार आहे. कोट्यवधींची रक्कम यामुळे वाचणार असून त्याचा फायदा देशांतर्गत उत्पादन वाढीला मिळणार आहे.
- निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर

नागरी उड्डयन क्षेत्रातही हवी आत्मनिर्भरता
नागरी उड्डयण क्षेत्रातही या प्रकारच्याच आत्मनिर्भरतेची गरज आहे. या साठी स्पेस, एअर फोर्स आणि आर्मी एव्हिएशन यांनी एकत्रित येऊन त्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. याचा फायदा हवाई दलाबरोबरच नागरी उड्डयन क्षेत्राला होईल.
- निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: From big guns to missiles, India bans import of 101 defense items to boost self reliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.