भारत-पाकिस्तानमध्ये वाढत असलेल्या तणावाचा परिणाम आता हवाई मार्गांवर देखील स्पष्टपणे दिसून येत आहे. दोन्ही देशांनी एकमेकांविरोधात अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. यामध्ये हवाई क्षेत्र बंद करण्याचा मोठा निर्णय देखील सामील आहे. मात्र, आता पाकिस्तानला आणखी मोठा झटका लागला आहे. तीन मोठ्या आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी पाकिस्तानचा एअरस्पेस न वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, ब्रिटिश एअरवेज, स्विस इंटरनॅशनल आणि एमिरेट्स या कंपन्या पाकच्या हवाई हद्दीतून प्रवास करणे टाळत आहेत. दरम्यान, एअर फ्रान्स आणि लुफ्थांसा या विमान कंपन्यांनी अधिकृत निवेदन जारी करून, भारत-पाकिस्तान तणावादरम्यान पुढील आदेश येत नाही, तोपर्यंत पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचा वापर करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या पाकिस्तानच्या आकाशात खूप कमी विमाने उडत असल्याचे, फ्लाईट ट्रॅकर डेटावरून स्पष्ट झाले आहे.
पाकिस्तानचे नुकसान होणार?एअरलाईन्सच्या या मोठ्या निर्णयामुळे पाकिस्तानला मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. कोणतेही विमान पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचा वापर करण्यासाठी काही ठराविक शुल्क पाकला देऊ करते. जर, विमानांनी पाकच्या हद्दीतून उड्डाणे बंद केली तर, पाकिस्तानला हे शुल्क मिळणार नाही. यामुळे पाकिस्तानची आर्थिकस्थिती बिघडू शकते.