बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 14:53 IST2025-11-05T14:52:35+5:302025-11-05T14:53:07+5:30
Bihar Election 2025 Update:

बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
पटना: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होण्यापूर्वीच राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मोठा धक्का बसला आहे. बिहारमध्ये भाजपाने तिकीट कापलेल्या आमदाराने तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वातील राजदमध्ये प्रवेश केला आहे.
भागलपूर जिल्ह्यातील पीरपैंती विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार लल्लन कुमार यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देऊन राष्ट्रीय जनता दलात प्रवेश केला आहे. लल्लन कुमार यांनी औपचारिकरित्या पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले आहे. तसेच राबडी देवींचीही भेट घेतली आहे.
बिहारमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीचे तिकीट भाजपने नाकारले होते, यामुळे लल्लन नाराज होते. पीरपैंती ही जागा अनुसूचित जातीसाठी राखीव होती, तिथून उमेदवारी दिली नाही. त्याऐवजी भाजपाने मुरारी पासवान यांना तिकीट दिले होते.
भाजपला दलित नेतृत्वाची आता गरज राहिलेली नाही, असे मला वाटत असल्याचा आरोप लल्लन कुमार यांनी आपल्या राजीनाम्यात केला आहे. तसेच माझी भाजपसोबतची राजकीय यात्रा इथे संपते आहे, असेही ते म्हणाले आहेत. राजदमध्ये प्रवेश केल्यानंतर लल्लन कुमार यांनी तेजस्वी यादव आणि राबडी देवी यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. ऐन मतदानाच्या तोंडावर एका विद्यमान आमदाराने पक्ष बदलल्याने भागलपूर परिसरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. लल्लन कुमार यांच्या या निर्णयाचा परिणाम पीरपैंती आणि आसपासच्या जागांवर होऊ शकतो.