खासदार राघव चड्डा यांना मोठा धक्का, आपने ‘या’ पदावरून केली उचलबांगडी, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 13:59 IST2026-04-02T13:59:23+5:302026-04-02T13:59:54+5:30
Raghav Chadha News: राघव चड्डा हे जनमानसात लोकप्रिय होत असतानाच आम आदमी पक्षाने त्यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. तसेच त्यांची पक्षाच्या राज्यसभेच्या उपनेतेपदावरून उचलबांगडी केली आहे.

खासदार राघव चड्डा यांना मोठा धक्का, आपने ‘या’ पदावरून केली उचलबांगडी, कारण काय?
गेल्या काही दिवसांपासून जनहिताचे विविध प्रश्न उपस्थित केल्याने आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्डा हे समाजमाध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरले होते. मात्र एकीकडे राघव चड्डा हे जनमानसात लोकप्रिय होत असतानाच आम आदमी पक्षाने त्यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. तसेच त्यांची पक्षाच्या राज्यसभेच्या उपनेतेपदावरून उचलबांगडी केली आहे. आम आदमी पक्षाने या संदर्भात राज्यसभा सचिवालयाला पत्र लिहिलं असून, राघव चड्डा यांच्या जागी अशोक मित्तल यांची राज्यसभेतील उपनेते म्हणून नियुक्ती केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राघव चड्डा यांना राज्यसभेत बोलण्यासाठी अधिक वेळ उपलब्ध करून देऊ नये, अशी विनंतीही आम आदमी पक्षाने या पत्राच्या माध्यमातून केली आहे. गेल्या काही काळापासून राघव चड्डा हे जनहिताच्या मुद्द्यावरून राज्यसभेमध्ये सातत्याने बोलत होते. त्यात विमानतळावर महागड्या दरात मिळणाऱ्या चहापासून ते डिलिव्हरी बॉईजच्या प्रश्नांपर्यंत अनेक मुद्दे त्यांनी सभागृहात उपस्थित केले होते. त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली होती, अशा परिस्थितीत राघव चड्डा यांच्यावर पक्षाकडून कारवाई झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
दरम्यान, राघव चड्डा यांच्यावर कारवाई का करण्यात आली, याचं कारण आम आदमी पक्षाने दिलेलं नाही. मात्र ही कारवाई शिस्तभंग आणि पक्षशिस्तीचं पालन न केल्यामुळे करण्यात आली असावी, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. राघव चड्डा हे आम आदमी पक्षाच्या अधिकृत भूमिकेच्या विरोधात जाऊन बोलतात. तसेच केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतरही राघव चड्डा यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती, या बाबीही विचारात घेऊन ही कारवाई करण्यात आली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.