Big announcement of the Center: Wheat 3 and Rice 3 Rupees, 2 kg increase in monthly quota | केंद्राची मोठी घोषणा : गहू २ तर तांदूळ ३ रुपये, मासिक कोट्यात दोन किलोची वाढ

केंद्राची मोठी घोषणा : गहू २ तर तांदूळ ३ रुपये, मासिक कोट्यात दोन किलोची वाढ

नवी दिल्ली : देशव्यापी लॉकडाउनदरम्यान सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत ८० कोटी लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात वाटप होणाऱ्या धान्याचा मासिक कोटा दोन किलोने वाढवून सात किलो करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. विशेष म्हणजे स्वस्त दर धान्य दुकानांतून (रेशन शॉप्स) २७ रुपये किलोचा गहू प्रतिकिलो दोन रुपये दराने आणि ३२ रुपये किलोचा तांदूळ प्रतिकिलो ३ रुपये दराने दिला जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या समितीच्या बैठकीनंतर केंद्रीय माहिती व नभोवाणीमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, सरकारने सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत ८० कोटी लोकांना प्रतिव्यक्ती सात किलो धान्य अत्यंत स्वस्त दरात देण्याचा निर्णय घेतला आहे.

२७ रुपये किलो भाव असलेला गहू प्रतिकिलो २ रुपयाने आणि ३२ रुपये किलो भावाचा तांदूळ स्वस्त दर दुकानांतून प्रतिकिलो ३ रुपये दराने ८० कोटी लाभार्थ्यांना दिला जाईल. सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत वाटप करण्यासाठी सर्व राज्यांना केंद्राकडून धान्य उचलण्यास सांगण्यात आले आहे. राष्ट्रीय अन्नधान्य सुरक्षा कायद्यातहत सरकार दरमहा ८० कोटी लाभार्थ्यांना अत्यंत स्वस्त दरात ५ किलो धान्य पुरविते.

Web Title: Big announcement of the Center: Wheat 3 and Rice 3 Rupees, 2 kg increase in monthly quota

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.