लॉरेन्स बिश्नोई टोळीविरोधात मोठी कारवाई! देशभरात छापे, पानिपतमधून शूटरला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 13:27 IST2024-10-17T13:06:24+5:302024-10-17T13:27:03+5:30
Lawrence Bishnoi : मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई टोळीविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे.

लॉरेन्स बिश्नोई टोळीविरोधात मोठी कारवाई! देशभरात छापे, पानिपतमधून शूटरला अटक
Lawrence Bishnoi : माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची काही दिवसापूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीचे नाव समोर आले आहे. दरम्यान, आता लॉरेन्स बिश्नोई टोळीविरोधात मुंबईपोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. पोलिसांनी देशभरात छापेमारी सुरू केली आहे. दिल्ली पोलिसांनी गुरुवारी सकाळी चकमकीत लॉरेन्स बिश्नोई आणि हाशिम बाबा टोळीच्या आंतरराज्य शार्प शूटरला अटक केली.
उत्तर कोरियाने संविधानात बदल केले, दक्षिण कोरियाचे टेन्शन वाढले; वाचा नेमकं प्रकरण काय?
पोलिसांनी पकडलेला हा शार्प शूटर योगेश दिल्लीतील ग्रेटर कैलास येथील जिम मालक नादिर शाह यांच्या हत्येचा मुख्य शूटर होता. पोलिसांच्या कारवाईदरम्यान एका शार्प शूटरच्या पायात गोळी लागल्याने तो जखमी झाला. यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून एक क्रमांक नसलेली दुचाकी, एक पिस्तूल आणि अनेक काडतुसे जप्त केली आहेत. योगेश कुमार उर्फ राजू असे आरोपीचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील बदाऊनचा राहणारा आहे.
याआधी, हरयाणा आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त कारवाईत लॉरेन्स बिश्नोई टोळीचा शूटर सुखवीर उर्फ सुखा याला पानिपतच्या सेक्टर २९ पोलीस स्टेशन परिसरातून अटक करण्यात आली होती. सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणात तो आरोपी आहे.
नवी मुंबई पोलीस आणि पानिपत पोलिसांनी संयुक्त कारवाईत लॉरेन्स टोळीचा शूटर सुखबीर उर्फ सुखा याला अटक केली. नवी मुंबईतील पनवेल शहर पोलीस सलमान खानच्या पनवेल फार्म हाऊसच्या रेकी प्रकरणाचा तपास करत होते. लॉरेन्स बिश्नोई टोळीतील गुंडांनी सलमान खानवर हल्ला करण्यासाठी पनवेल फार्महाऊसची रेकी केली होती. यात पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली होती. या प्रकरणात सुखबीर उर्फ सुखा फरार होता, त्याला सलमान खानवर हल्ला करण्याची सुपारी मिळाल्याची माहिती समोर आली.
पनवेल शहर पोलीस त्याचा शोध घेत होते. बुधवारी (16 ऑक्टोबर 2024) पोलिसांचे पथक त्याच्या शोधात पानिपतला पोहोचले. पनवेल शहर पोलिसांकडे सुखाचे लाईव्ह लोकेशन होते, तो पानिपत येथील एका हॉटेलमध्ये राहत होता. पोलिस पथकातील अनेकांनी त्या हॉटेलमध्ये रूम बुक केल्या.
यानंतर पानिपत पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. पानिपत पोलीसही घटनास्थळी पोहोचले. ज्या खोलीत सुक्का राहिला होता खोलीचा दरवाजा उघडण्यात आला. सुरुवातीला त्याला पाहिल्यानंतर त्याची ओळख पटली नाही पण नंतर त्याची चौकशी केल्यानंतर तो लॉरेन्सचा शूटर सुखा असल्याचे समोर आले त्यानंतर त्याला अटक करण्यात आले.