भूपेंद्र पटेल नवे मुख्यमंत्री; गुजरातमध्ये आज शपथविधी, भाजप आमदारांकडून एकमताने निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 05:19 AM2021-09-13T05:19:34+5:302021-09-13T05:20:21+5:30

पहिल्यांदाच आमदारपदी निवडून आलेले भूपेंद्र पटेल यांची गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून राज्य भाजप विधिमंडळ पक्षाच्या झालेल्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली.

bhupendra patel new chief minister of Gujarat and today swearing in ceremony pdc | भूपेंद्र पटेल नवे मुख्यमंत्री; गुजरातमध्ये आज शपथविधी, भाजप आमदारांकडून एकमताने निवड

भूपेंद्र पटेल नवे मुख्यमंत्री; गुजरातमध्ये आज शपथविधी, भाजप आमदारांकडून एकमताने निवड

googlenewsNext

गांधीनगर : पहिल्यांदाच आमदारपदी निवडून आलेले भूपेंद्र पटेल यांची गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून राज्य भाजप विधिमंडळ पक्षाच्या रविवारी झालेल्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली. पटेल उद्या, सोमवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

विजय रुपानी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर हालचालींना वेग आला होता. नाराज असलेल्या पटेल समुदायाचे समाधान करण्यासाठी भूपेंद्र पटेल यांची निवड केल्याचे सांगण्यात आले. भूपेंद्र पटेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्तीय आहेत. 

पुढच्या वर्षी गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत विजय रुपानी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला विजय मिळणे शक्य नाही, असा निष्कर्ष पक्षाच्या सर्वेक्षणातून समोर आला होता. पक्षात रुपानी यांच्याविषयी नाराजी होती. ते राज्यातील कोरोना स्थिती नीटपणे हाताळण्यात 
अयशस्वी ठरल्याने त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास श्रेष्ठींनी सांगितले. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नवे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांच्या नावाचा प्रस्ताव विजय रुपानी यांनीच मांडला व तो एकमताने संमत झाला. (वृत्तसंस्था)

भाजपचे धक्कातंत्र कायम 

- गुजरातचे भावी मुख्यमंत्री म्हणून मनसुख मांडवीय, उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांसह काही जणांची नावे शर्यतीत होती. भूपेंद्र पटेल यांचे नाव अजिबात चर्चेत नव्हते. अशाच नावाची निवड करून भाजपचे आपले धक्कातंत्र कायम ठेवले आहे. 

- कर्नाटक व उत्तराखंडचे तत्कालीन मुख्यमंत्री अनुक्रमे बी. एस. ये़डीयुरप्पा, तीरथसिंह रावत यांचेही अचानक राजीनामे घेतले होते.  

असा आहे भूपेंद्र पटेल यांचा राजकीय प्रवास

- २०१७ साली गुजरात विधानसभा निवडणुकांत घाटलोडिया मतदारसंघातून भूपेंद्र पटेल यांनी काँग्रेस उमेदवार शशिकांत पटेल यांचा पराभव केला. ते पहिल्यांदाच आमदारपदी निवडून आले होते. त्याआधी पटेल अहमदाबाद महापालिकेत नगरसेवक होते. 

 - अहमदाबाद नगरविकास प्राधिकरणाचे व अहमदाबाद महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी याआधी काम पाहिले आहे. त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे.

विकासाला नवी ऊर्जा मिळेल : अमित शहा

पटेल यांची गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले की,  गुजरातच्या विकास प्रक्रियेला पटेल यांच्या निवडीमुळे नवी ऊर्जा मिळेल. येथील जनकल्याणाची कामे ते आणखी जोमाने पुढे नेतील.  

नितीन गडकरी यांचीही सहमती 

भूपेंद्र पटेल यांच्या नावाची घोषणा करण्यापूर्वी अमित शहा यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली. या नावाला गडकरी यांनी सहमती दिल्याचे समजते.

‘पराभव दिसत असल्याने हटविले’

रुपानी यांच्या नेतृत्वाखाली गुजरातच्या विधानसभा निवडणुका लढल्यास तर काँग्रेसकडून भाजपचा पराभव अटळ होता, असा निष्कर्ष भाजपने केलेल्या सर्वेक्षणातून काढल्यानेच त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविल्याचा दावा काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांनी केला.
 

Web Title: bhupendra patel new chief minister of Gujarat and today swearing in ceremony pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.