हृदयद्रावक! पतीच्या मृत्यूनंतर १ तासाने पत्नीने दिला मुलीला जन्म; काळजात चर्र करणारी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 10:39 IST2025-01-23T10:39:03+5:302025-01-23T10:39:41+5:30
भोपाळमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे, ज्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

हृदयद्रावक! पतीच्या मृत्यूनंतर १ तासाने पत्नीने दिला मुलीला जन्म; काळजात चर्र करणारी घटना
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे, ज्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. अशी घटना यापूर्वी क्वचितच कोणी पाहिली असेल किंवा ऐकली असेल. कारने प्रवास करणाऱ्या पतीचा अपघातात मृत्यू झाला. तर यामध्ये त्याची गर्भवती पत्नी अपघातातून वाचली. पतीच्या मृत्यूच्या एका तासानंतर तिने मुलीला जन्म दिला आहे.
ही घटना लालघाट येथील हलालपूर बस स्टँडवर घडली आहे. जिथे एक कार डिव्हायडरला धडकून उलटली आणि या अपघातात कार चालवणारे महेंद्र मेवाडा आणि सतीश मेवाडा यांचा मृत्यू झाला. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रातीबढ येथील रहिवासी महेंद्र मेवाडा यांची पत्नी बबली गर्भवती होती आणि मंगळवारी रात्री उशिरा तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या तेव्हा महेंद्र आपल्या पत्नीसह कारने भोपाळला निघाले. महेंद्र आणि बबली यांच्यासोबत महेंद्र यांची आई, काकू आणि आणखी एक नातेवाईक कारमध्ये होते.
रात्रीच्या अंधारात भोपाळमधील लालघाटी परिसरातील हलालपूर बस स्टँडसमोर कार डिव्हायडरला धडकून उलटली, ज्यामध्ये पाच जण जखमी झाले. यानंतर, सर्वांना रुग्णवाहिकेने रुग्णालयात पाठवण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी महेंद्र मेवाडा आणि सतीश यांना मृत घोषित केलं.
डॉक्टरांनी महेंद्र यांना मृत घोषित केल्यानंतर एक तासांनी त्यांची पत्नी बबलीने एका मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्माच्या एक तास आधी तिच्या डोक्यावरून वडिलांचं छत्र हरपलं आहे. आई आणि बाळाची प्रकृती उत्तम असल्याची माहिती मिळत आहे.