'ओवैसींसारख्या गद्दारांनी पाकिस्तानातून निवडणूक लढवावी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 12:57 IST2018-11-15T12:48:52+5:302018-11-15T12:57:29+5:30
भारत माता की जय न म्हणणाऱ्यांना देशाबाहेर हाकलू- भाजपा नेता

'ओवैसींसारख्या गद्दारांनी पाकिस्तानातून निवडणूक लढवावी'
अमरावती: तेलंगणात भाजपाची सत्ता आल्यास भारत माता की जय आणि वंदे मातरम् न म्हणणाऱ्यांना देशाबाहेर हाकलून देऊ, असं विधान भाजपाचे नेते राजा सिंह यांनी केलं. सिंह यांनी एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यावरही जहरी टीका केली आहे. भारत माता की जय म्हणण्यास नकार देणाऱ्या ओवैसी यांनी पाकिस्तानातून निवडणूक लढवावी, असंदेखील ते म्हणाले. त्यांच्या या विधानानं वाद होण्याची शक्यता आहे.
भाजपा नेते राजा सिंह अनेकदा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. आता त्यांनी तेलंगणा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरुन असदुद्दीन ओवैसी यांना लक्ष्य केलं आहे. 'राज्यात भाजपाची सत्ता आल्यास, भारत माता की जय म्हणण्यास नकार देणाऱ्यांना देशाबाहेर हाकलून देऊ,' असं सिह यांनी म्हटलं. 'भारत माता की जय म्हणणार नाही, असं ओवैसी अनेकदा जाहीर सभांमध्ये म्हणतात. तुम्ही भारतात भारत माता की जय म्हणणार नाही. मग काय पाकिस्तानात जाऊन भारत माता की जय म्हणणार का?, असा प्रश्न मला त्यांना विचारावासा वाटतो. जर तुम्हाला भारत माता की जय म्हणायचं नसेल, तुमचं भारतावर प्रेम करत नसेल, तर अशा गद्दारांनी पाकिस्तानात जावं आणि तिथून निवडणूक लढवावी,' असं वादग्रस्त विधान सिंह यांनी केलं.
भाजपाची सत्ता आल्यावर भारत माता की जय आणि वंदे मातरम् न म्हणणाऱ्यांना देशाबाहेर काढण्यात येईल, असं राजा सिंह म्हणाले. 'जर त्या गद्दारांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना परिणाम भोगावे लागतील,' असा इशारादेखील त्यांनी दिला. सिंह यांनी याआधीही अशी विधानं केली आहेत. तेलंगणात भाजपाची सत्ता आल्यास, हैदराबादचं नाव बदलून भाग्यनगर करण्यात येईल, असं सिंह यांनी म्हटलं होतं.