Bharat Bandh: आज केंद्रीय कामगार, शेतकरी संघटनाचा देशव्यापी संप; तुमच्या शहरात काय सुरू आणि काय बंद?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 09:32 IST2026-02-12T09:26:28+5:302026-02-12T09:32:33+5:30
Central Trade Unions Strike: केंद्र सरकारच्या नवीन कामगार कायद्यांविरोधात आज देशभरातील ३० कोटी कामगार संपावर उतरले आहेत. संयुक्त किसान मोर्चा आणि प्रमुख कामगार संघटनांनी या भारत बंदची हाक दिली आहे. त्यामुळे बँका आणि वाहतूक सेवांवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.

Bharat Bandh: आज केंद्रीय कामगार, शेतकरी संघटनाचा देशव्यापी संप; तुमच्या शहरात काय सुरू आणि काय बंद?
केंद्र सरकारच्या नवीन कामगार कायद्यांविरोधात आज (१२ फेब्रुवारी २०२६) केंद्रीय कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांनी 'भारत बंद'ची हाक दिली आहे. या देशव्यापी संपात देशभरातील सुमारे ३० कोटी कामगार सहभागी होण्याची शक्यता असून, यामुळे बँकिंग, सार्वजनिक वाहतूक आणि सरकारी सेवांवर मोठा परिणाम होण्याची चिन्हे आहेत.
केंद्र सरकारने गेल्या वर्षी २९ जुन्या कामगार कायद्यांच्या जागी चार नवीन कामगार संहिता लागू केल्या आहेत. या नवीन कायद्यांमुळे कामगारांच्या हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. या कायद्यांच्या निषेधार्थ संयुक्त किसान मोर्चा, अखिल भारतीय किसान सभा आणि ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन यांसारख्या मोठ्या संघटनांनी या संपाला पूर्ण पाठिंबा दिला आहे.
'या' सेवांवर होणार मोठा परिणाम
१) बँकिंग सेवा: प्रमुख बँक संघटना संपात सामील झाल्यामुळे बँक व्यवहारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, बँका अधिकृतपणे बंद नसून ऑनलाईन व्यवहार आणि एटीएम सेवा सुरू राहतील.
२) वाहतूक सेवा: बस, रिक्षा आणि ट्रक चालक संघटनांच्या सहभागामुळे प्रमुख शहरांमध्ये वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
3) बाजारपेठ आणि व्यापार: घाऊक आणि किरकोळ बाजारपेठांमधील व्यापारी संघटनांनी संपाला नैतिक पाठिंबा दिल्याने अनेक ठिकाणी दुकाने बंद राहू शकतात.
४) शिक्षण संस्था: वाहतुकीच्या समस्या आणि सुरक्षिततेचे कारण लक्षात घेता, काही जिल्ह्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली.
काय सुरू राहणार?
- रुग्णवाहिका आणि रुग्णालये
- अग्निशमन दल
- विमान सेवा
- दूध आणि भाजीपाला पुरवठा