Bhagwant Maan: सात वर्षानंतर मुला-मुलीची भेट, दोघांना पाहून मुख्यंमंत्री भगवंत मान झाले भावूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 19:48 IST2022-03-17T15:01:21+5:302022-03-17T19:48:12+5:30
भगवंत मान आणि त्यांच्या पत्नीचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झाला असून, दोन्ही मुले आईसोबत अमेरीकेत राहतात.

Bhagwant Maan: सात वर्षानंतर मुला-मुलीची भेट, दोघांना पाहून मुख्यंमंत्री भगवंत मान झाले भावूक
चंडीगड: काल(16 मार्च) पंबाजचे निवनिर्वाचित मुख्यमंत्री भगवंत मान यांचा शपथविधी सोहळा पार पडला. शहीद भगत सिंग यांच्या गावी झालेल्या शपथविधी सोहळ्यात 3-4 लाख लोक उपस्थित होते. दरम्यान, या सोहळ्यात भगवंत मान यांची तब्बल 7 वर्षानंतर मुलांची भेट झाली. मुलगा आणि मुलीला भेटून मान भावनाविवश झालेले पाहायला मिळाले. मान आणि त्यांच्या पत्नीचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झाला असून, दोन्ही मुले आईसोबत अमेरीकेत राहतात.
मान यांना 17 वर्षीय मुलगा दिलशान असून, तो बास्केटबॉलचा खेळाडू आहे. तर, मुलगी सीरत 21 वर्षांची आहे. दोघेही अमेरिकेत शिक्षण घेतात. वडील मुख्यमंत्री होणार असल्याचे वृत्त कळताच ते अमेरिकेहून पंजाबमध्ये आले. शपथविधी समारंभाच्या वेळी मान मुलगा-मुलीला कडकडून भेटले.
यापूर्वी 2014 मध्ये मान, पत्नी इंदरप्रीत कौर व दोन्ही अपत्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी एकत्र दिसले होते. इंदरप्रीत कौर यांनी मान यांचा प्रचारही केला होता. त्यानंतर दोघांमधील अंतर वाढले व इंदरप्रीत कौर दोन्ही अपत्यांना घेऊन विदेशात गेल्या होत्या.
मान यांची आई हरपाल कौर यांनाही नातू व नातीला पाहून आनंद झाला. कुटुंबापासून वेगळे झाल्याचे मानसिक दु:ख मान यांनी सहन केले. परंतु त्यावेळी त्यांची आई व बहीण त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिल्या होत्या. राजकारणात सतत भरारी घेणारे मान अनेक ठिकाणी आपले दु:ख व्यक्त करीत होते. मुले आपल्याबरोबर नसल्याची खंतही त्यांना नेहमी वाटते. राजकारणात एवढा व्यग्र झालो की, मागील सात वर्षांना आपल्या मुलांना कधी भेटू शकलो नव्हतो, असे ते नेहमी म्हणायचे.