मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून काँग्रेस नेत्यांना बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 15:54 IST2019-07-27T15:49:03+5:302019-07-27T15:54:39+5:30
मध्य प्रदेशमधील बैतूल जिल्ह्यामध्ये मुलांना पळवून नेणारी टोळी असल्याच्या संशयावरून तीन जणांना बेदम मारहाण करण्यात आली आहे.

मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून काँग्रेस नेत्यांना बेदम मारहाण
भोपाळ - मध्य प्रदेशमधील बैतूल जिल्ह्यामध्ये मुलांना पळवून नेणारी टोळी असल्याच्या संशयावरून तीन जणांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये काँग्रेसच्या दोन नेत्यांचा आणि एका सामाजिक कार्यकर्त्याचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे धर्मेंद्र शुक्ला, रामू सिंह लांजीवार आणि ललित बरास्कर हे गुरुवारी रात्री आपल्या कारने घरी परतत होते. शाहपूर ते केसियादरम्यान ते प्रवास करत असताना त्यांना रस्त्यावर झाडाच्या काही फांद्या पडलेल्या दिसल्या. त्याचवेळी गावातील काही मंडळींनी त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. यामध्ये तीन ही जण जखमी झाले आहेत तसेच कारचेही नुकसान झाले आहे.
बैतूल जिल्ह्यामध्ये काही दिवसांपासून लहान मुलांना चोरणारी टोळी सक्रिय झाली असल्याची अफवा पसरली आहे. त्यामुळे काँग्रेस नेते जेव्हा कारने प्रवास करत होते तेव्हा ते तिघे मुलांना पळवणाऱ्या टोळीचे सदस्य असल्याचा संशय गावकऱ्यांना आला. गावकऱ्यांनी गाडी अडवली आणि कारमधून बाहेर काढून त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत काँग्रेसचे धर्मेंद्र शुक्ला, रामू सिंह लांजीवार आणि ललित बरास्कर जखमी झाले आहेत. शाहपूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी दीपक पराशर यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटेनची माहिती मिळताच आम्ही तातडीने घटनास्थळी दाखल झालो. मात्र आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.