भारतीय वायुसेनेचा कर्मचारी निघाला पाकिस्तानचा हेर; विमाने आणि क्षेपणास्त्रांची दिली माहिती, आसाममधून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 09:44 IST2026-03-23T09:41:00+5:302026-03-23T09:44:13+5:30
भारतीय वायुसेनेच्या अतिसंवेदनशील तळांची माहिती पाकिस्तानला पुरवणाऱ्या एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

भारतीय वायुसेनेचा कर्मचारी निघाला पाकिस्तानचा हेर; विमाने आणि क्षेपणास्त्रांची दिली माहिती, आसाममधून अटक
Air Force Staffer Arrested For Spying: भारतीय वायुसेनेच्या अतिसंवेदनशील तळांची माहिती पाकिस्तानला पुरवणाऱ्या एका मोठ्या हेरगिरीच्या जाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. राजस्थान इंटेलिजन्स आणि एअरफोर्स इंटेलिजन्सने संयुक्त कारवाई करत आसाममधील चबुआ वायुसेना तळावर कार्यरत असलेल्या सुमित कुमार (३६) या सिव्हिल कर्मचाऱ्याला अटक केली आहे. आरोपी सुमित हा पैशांच्या मोबदल्यात लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्र प्रणालीची गुप्त माहिती पाकिस्तानी हँडलर्सना पुरवत होता.
तपासाची चक्रे कशी फिरली?
या प्रकरणाची पाळेमुळे जानेवारी २०२६ मध्ये जमिडसळमेरमध्ये सापडली होती. राजस्थान पोलिसांनी झाबरा राम नावाच्या एका संशयिताला अटक केली होती. त्याच्या चौकशीतून सुमित कुमारचे नाव समोर आले. तेव्हापासून गुप्तचर यंत्रणा सुमितवर पाळत ठेवून होत्या. खात्री पटल्यानंतर त्याला आसामच्या दिब्रुगड जिल्ह्यातील चबुआ येथून ताब्यात घेऊन जयपूरला आणण्यात आले.
२०२३ पासून आयएसआयच्या संपर्कात
मूळचा उत्तर प्रदेशातील प्रयागराजचा असलेला सुमित कुमार आसाममधील चबुआ एअरफोर्स स्टेशनवर मल्टी-टास्किंग स्टाफ म्हणून कार्यरत होता. चौकशीत त्याने धक्कादायक खुलासे केले आहेत. सुमित २०२३ पासून सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात होता. त्याने चबुआ आसाम आणि नाल बिकानेर येथील वायुसेना तळांची महत्त्वाची माहिती लीक केली. भारतीय लढाऊ विमाने कुठे तैनात आहेत, क्षेपणास्त्र प्रणालीची लोकेशन काय आहे आणि महत्त्वाच्या लष्करी अधिकाऱ्यांची वैयक्तिक माहिती त्याने शत्रू देशाला पुरवली.
फेक सोशल मीडिया अकाऊंट्स
महत्त्वाचे म्हणजे, सुमितने स्वतःच्या नावे घेतलेल्या मोबाईल क्रमांकांवरून पाकिस्तानी हँडलर्सना सोशल मीडिया अकाऊंट्स तयार करून दिली होती, जेणेकरून ते ओळख लपवून संवाद साधू शकतील.
कठोर कलमान्वये गुन्हा दाखल
आरोपी सुमित कुमारवर २२ मार्च रोजी जयपूर येथील विशेष पोलीस ठाण्यात ऑफिशियल सिक्रेट्स अॅक्ट १९२३ आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी त्याला रीतसर अटक करण्यात आली. "यात फक्त एका व्यक्तीचा हात नसून हा पाकिस्तानचा मोठ्या हेरगिरीच्या जाळ्याचा भाग आहे. आम्ही या प्रकरणातील इतर दुवे आणि हँडलर्सचा शोध घेत आहोत. ही कारवाई देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने मोठे यश आहे," असे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रफुल्ल कुमार म्हणाले.
भारताच्या संरक्षण तळांना लक्ष्य करण्याचा कट
तपास यंत्रणांच्या मते, हा देशव्यापी हेरगिरीच्या नेटवर्कचा एक भाग आहे. पाकिस्तानी हँडलर्स विशेषतः लष्करी तळांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पैशांचे आमिष दाखवून जाळ्यात ओढत आहेत. सुमित कुमारने नेमकी किती माहिती आणि किती पैशांच्या बदल्यात विकली, याचा अधिक तपास आता सेंट्रल इंटरोगेशन सेंटरमध्ये सुरू आहे.