मुस्लिम विद्यार्थ्याला 'टेररिस्ट' म्हटले, प्राध्यापकाविरोधात कठोर कारवाई; नेमका कुठे घडला हा प्रकार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 16:42 IST2026-03-28T16:40:50+5:302026-03-28T16:42:10+5:30
PES University: कर्नाटकची राजधानी असलेल्या बेंगळुरू येथील नामांकित पीईएस विद्यापीठात एका प्राध्यापकाने मुस्लिम विद्यार्थ्याला वर्गासमोर दहशतवादी म्हटल्याची धक्कादायक घटना समोर आली.

मुस्लिम विद्यार्थ्याला 'टेररिस्ट' म्हटले, प्राध्यापकाविरोधात कठोर कारवाई; नेमका कुठे घडला हा प्रकार?
कर्नाटकची राजधानी असलेल्या बेंगळुरू येथील नामांकित पीईएस विद्यापीठात एका प्राध्यापकाने मुस्लिम विद्यार्थ्याला वर्गासमोर दहशतवादी म्हटल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने संबंधित प्राध्यापकावर कठोर कारवाई केली असून त्याला निलंबित करण्यात आले.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी घडली. 'अफ्फान' नावाच्या विद्यार्थ्याने कोणाला तरी भेटण्यासाठी वर्गाबाहेर जाण्याची परवानगी मागितली होती. याच गोष्टीचा राग आल्याने प्राध्यापकाचा संयम सुटला आणि त्यांनी संपूर्ण वर्गासमोर विद्यार्थ्यावर अपमानजनक आणि जातीय टिप्पणी करण्यास सुरुवात केली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये प्राध्यापक विद्यार्थ्यावर ओरडताना दिसत आहेत. "तुला लाज वाटत नाही का, टेररिस्ट !" असे शब्द त्यांनी वापरल्याचे ऐकू येत आहे. इतकेच नव्हे तर, इराण युद्धासाठी तुझ्यासारखेच लोक जबाबदार आहेत आणि डोनाल्ड ट्रम्प येऊन तुला घेऊन जातील, अशा शब्दांत त्यांनी विद्यार्थ्याचा अपमान केला.
विद्यापीठ प्रशासनाची कारवाई
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पीईएस विद्यापीठाने तपास पूर्ण होईपर्यंत संबंधित प्राध्यापकाला तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. विद्यापीठाच्या कुलगगुरूंनी एका पत्राद्वारे स्पष्ट केले की, अशा प्रकारची घटना संस्थेच्या इतिहासात कधीही घडली नव्हती. दोषी प्राध्यापकावर कडक शिस्तभंगविषयक कारवाई केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे. दुसरीकडे, या प्रकरणाला पाठिंबा देणाऱ्या अन्य तीन विद्यार्थ्यांनाही वेगवेगळ्या कारणास्तव निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
पोलीस तक्रार दाखल
काँग्रेसची विद्यार्थी संघटना 'नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया'ने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी प्राध्यापकाने जाहीर माफी मागावी आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.