प्रेमाचा दुर्दैवी शेवट; प्रेयसीने लग्नाची पत्रिका दाखवताच बॉडीबिल्डर तरुणाने मृत्यूला कवटाळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 13:36 IST2026-02-09T12:54:51+5:302026-02-09T13:36:46+5:30
Bengaluru Body Builder Ends life : प्रेयसीने अचानक आपल्या लग्नाची पत्रिका दाखवताच तरुणाला जबर मानसिक धक्का बसला!

प्रेमाचा दुर्दैवी शेवट; प्रेयसीने लग्नाची पत्रिका दाखवताच बॉडीबिल्डर तरुणाने मृत्यूला कवटाळले
Bengaluru Body Builder Ends life : बंगळुरूतील २६ वर्षीय जिम ट्रेनर-बॉडीबिल्डर तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किरण असे या तरुणाचे नाव असून, त्याने आपल्या प्रेयसीसोबत व्हॅलेंटाईन्स डे साजरा करण्याचे स्वप्न पाहिले होते. पण, तिने थेट तिच्या लग्नाची पत्रिका त्याच्या हातात ठेवली. तीन वर्षांच्या प्रेमाचा असा शेवट झाल्याने, किरणला तीव्र मानसिक धक्का बसला आणि यामुळेच त्याने टोकाचे पाऊल उचलले.
नेमकं काय घडलं ?
बंगळुरूत राहणारा किरण गेल्या तीन वर्षांपासून एका तरुणीसोबत प्रेमसंबंधात होता. तिच्याशी लग्न करून आयुष्यात सेटल होण्याचे स्वप्न त्याने पाहिले होते. येत्या १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने तिला सरप्राईज गिफ्ट देण्याचाही त्याचा प्लॅन होता. मात्र, त्यापूर्वीच किरणला अनपेक्षित धक्का बसला.
लग्नाची पत्रिका दाखवताच मानसिक धक्का
प्रेयसीने किरणला दुसऱ्या तरुणाशी आपला साखरपुडा झाल्याचे आणि लवकर लग्न करणार असल्याचे सांगितले. तिने अचानक किरणच्या हातावर आपल्या लग्नाची पत्रिका ठेवली. या घटनेने किरण पूर्णपणे खचून गेला.
खोलीत कोंडून घेत आत्महत्या
प्रेयसीशी झालेल्या शेवटच्या भेटीनंतर किरण घरी परतला आणि स्वतःला खोलीत बंद करून घेतले. बराच वेळ होऊनही तो बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी दरवाजा ठोठावला. आतून प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडला असता, किरण गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने व्हिक्टोरिया रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
आर्थिक फसवणुकीचा आरोप
किरणच्या कुटुंबीयांनी संबंधित तरुणीवर गंभीर आरोप केले आहेत. तिच्यावर सुमारे ५० लाख रुपयांचे कर्ज असल्याचे सांगण्यात येते. हे कर्ज फेडण्यासाठी किरणने मदत करण्याचे आश्वासन दिले होते आणि काही रक्कम दिल्याचाही आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तरुणीविरोधात तक्रार नोंदवली असून, अधिक तपासानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.