पीएम किसान योजनेचे महाराष्ट्रातील लाभार्थी घटले; निकषात नाहीत, २२.४० लाख शेतकरी वगळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 06:31 IST2023-10-17T06:31:39+5:302023-10-17T06:31:47+5:30
पीएम किसानअंतर्गत महाराष्ट्रात १.०८ कोटीपेक्षा जास्त लाभार्थी होते. ज्यांना दरवर्षी केंद्र सरकारकडून ६००० रुपये प्रति वर्ष मिळत होते.

पीएम किसान योजनेचे महाराष्ट्रातील लाभार्थी घटले; निकषात नाहीत, २२.४० लाख शेतकरी वगळले
- हरीश गुप्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पीएम किसान योजनेंतर्गत लाभार्थींची सर्वाधिक घट महाराष्ट्रात झाली आहे. राज्यात चार वर्षांच्या कालावधीत २२.४० लाख शेतकरी या योजनेच्या यादीतून वगळण्यात आले आहेत.
अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीएम किसानअंतर्गत महाराष्ट्रात १.०८ कोटीपेक्षा जास्त लाभार्थी होते. ज्यांना दरवर्षी केंद्र सरकारकडून ६००० रुपये प्रति वर्ष मिळत होते. तथापि, लाभार्थ्यांची संख्या वेगाने घसरू लागली आणि ८५.६० लाखांवर आली. २०२३-२४ मध्ये जुलै २०२३ पर्यंत ही घसरण वाढत गेली. लाभार्थ्यांची संख्या २२.४० लाखांनी कमी झाली आहे.
या योजनेअंतर्गत ६००० रुपये २००० च्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केले जातात. जमीन, बँक खात्यांशी आधार लिंक असणे आणि इतर निकष तपासल्यानंतर ही संख्या खाली आली आहे. महाराष्ट्रात ही संख्या २०२०-२१ मध्ये १.०८ कोटींवरून २०२२-२३ मध्ये १.०४ कोटी आणि जुलै २०२३ पर्यंत ८५.४० लाखांवर आली आहे.
सर्वाधिक लाभार्थी अहमदनगरमध्ये
आकडेवारीनुसार पीएम किसान योजनेअंतर्गत सर्वांत जास्त लाभार्थी अहमदनगरमध्ये ५.१७ लाख आहेत. त्यानंतर सोलापूरमध्ये ४.५४ लाख, कोल्हापूर ४.०६ लाख, बीड व पुण्यात ३.८९ लाख, नागपूर १.५० लाख, नाशिक ३.८५ लाख, छत्रपती संभाजीनगर ३.२६ लाख आणि यवतमाळमध्ये २.७७ लाख लाभार्थी आहेत. या योजनेचे ३४ जिल्ह्यांत लाभार्थी आहेत.