योगगुरू बाबा रामदेव, आचार्य बालकृष्ण यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स; वाचा काय आहे प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 15:03 IST2022-12-07T15:01:39+5:302022-12-07T15:03:12+5:30
Baba Ramdev and Acharya Balakrishna : न्यायालयाने बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांना १२ जानेवारी २०२३ पर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

योगगुरू बाबा रामदेव, आचार्य बालकृष्ण यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स; वाचा काय आहे प्रकरण?
बेगुसराय : बिहारमध्ये योगगुरू बाबा रामदेव आणि त्यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण यांच्याविरोधात फसवणूक प्रकरणी समन्स जारी करण्यात आला आहे. दरम्यान, येथील बरौनी पोलीस ठाण्यात निंगा येथील रहिवासी तक्रारदार महेंद्र शर्मा यांनी दाखल केलेल्या तक्रार पत्रावर सुनावणी करताना बेगुसराय जिल्हा न्यायालयाच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी मोहिनी कुमारी यांनी बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांना फसवणूक प्रकरणी कलम ४२० आणि ४१७ अंतर्गत समन्स बजावण्याचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, न्यायालयाने बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांना १२ जानेवारी २०२३ पर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, १८ जून २०२२ रोजी बरौनी पोलीस स्टेशन परिसरातील निंगा गावातील रहिवासी महेंद्र शर्मा यांनी बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांच्याविरोधात सीजीएम न्यायालयात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणात पैसे घेऊनही उपचार केले जात नसल्याचा आरोप तक्रारदाराने केला होता.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
फिर्यादी महेंद्र शर्मा यांनी बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांच्यावर आरोप केला होता की, त्यांच्या उपचारासाठी पतंजली आयुर्वेद प्रायव्हेट लिमिटेड महर्षी कॉटेज योग ग्राम झुलामध्ये एकूण ९० हजार रुपये जमा केले होते. त्यांनी त्यांचा मुलगा नरेंद्र कुमार याच्या बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर केले होते. पैसे जमा केल्यानंतर तक्रारदार मुलगा आणि पत्नीसह पतंजलीने दिलेल्या तारखेनुसार आणि वेळेत उपचार करून घेण्यासाठी पोहोचले होते. परंतु, तेथे त्यांना तुमचे पैसे जमा झाले नसल्याचे सांगण्यात आले.
१२ जानेवारी २०२३ पर्यंत हजर राहण्याची नोटीस
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, पतंजलीने फसवणूक करून जमा करण्यात आलेले पैसे ठेवून घेतले. तक्रारदाराने दिलेल्या जबाबानंतर आणि साक्षीदारांनी दिलेल्या जबाबानंतर न्यायालयाने बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांच्या विरोधात पुराव्याची दखल घेत दोन्ही आरोपींना १२ जानेवारी २०२३ पर्यंत न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.