शौर्याला सलाम! मधमाशांचा हल्ला होताच स्वत:च्या जीवाची केली नाही पर्वा, २० चिमुकल्यांना वाचवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 14:14 IST2026-02-05T14:11:56+5:302026-02-05T14:14:20+5:30
एका अंगणवाडी कुकने २० मुलांचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात स्वत:चा जीव गमावला आहे. कंचन बाई मेघवाल असं या शूर महिलेचं नाव आहे.

फोटो - आजतक
मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यात एका अंगणवाडी कुकने २० मुलांचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात स्वत:चा जीव गमावला आहे. कंचन बाई मेघवाल असं या शूर महिलेचं नाव आहे. जिल्ह्यातील माधवाडा पंचायतीमधील रानपूर गावातील अंगणवाडी केंद्रात त्या कार्यरत होत्या. मुलं खेळत असताना अचानक मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला, मात्र कंचन बाईंनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मुलांचा जीव वाचवला.
सोमवारी जेव्हा मधमाशांनी मुलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कंचन बाई यांनी तात्काळ बचावकार्य सुरू केलं. त्यांनी ताडपत्री आणि चटईचा वापर करून मुलांना सुरक्षितपणे गुंडाळलं आणि अंगणवाडीच्या आत नेलं. या प्रक्रियेत मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि यामध्ये त्या जखमी झाल्या.
मुलांसाठी स्वत:चा जीव गमावला
कंचन बाई शाळेतच बेशुद्ध होऊन पडल्या. घटनेची माहिती मिळताच गावकरी तिथे धावून आले. पोलीस कॉन्स्टेबल कालूनाथ आणि पायलट राजेश राठोड यांनी त्यांना तातडीने सामुदायिक आरोग्य केंद्रात नेलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यांच्या शरीरावर असलेल्या असंख्य जखमांच्या खुणा त्यांच्या अतुलनीय शौर्याची साक्ष देत होत्या.
कुटुंबातील एकमेव कमावत्या व्यक्ती
कंचन बाई मेघवाल या केवळ अंगणवाडीच्या कूक नव्हत्या, तर त्या 'जय माता दी' बचत गटाच्या अध्यक्षाही होत्या. त्या आपल्या कुटुंबातील एकमेव कमावत्या व्यक्ती होत्या. त्यांचे पती शिवलाल पॅरालिसिसने आजारी आहेत. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. मंगळवारी शवविच्छेदनानंतर जेव्हा त्यांचा मृतदेह गावात पोहोचला, तेव्हा संपूर्ण गावाने पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
गावात भीतीचं वातावरण
या घटनेनंतर रानपूर गावात भीतीचं वातावरण आहे. गावातील एकाच हँडपंपजवळ मधमाशांनी हल्ला केला होता, त्यामुळे लोक तिथे पाणी भरण्यासही घाबरत आहेत. ग्रामस्थांनी मधमाशांचं पोळं तात्काळ हटवण्याची आणि कंचन बाईंच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.