ओदिशाची राजधानी भुवनेश्वर येथे आंदोलन करत असलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर मधमाश्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. येथील आयएएस बिष्णुपद सेठी यांच्या घराबाहेर आंदोलन करत असलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर मधमाश्यांनी अचानक हल्ला केला. आता या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
१० लाख रुपयांच्या जप्तीप्रकरणी आयएएस सेठी यांना सीबीआयकडून चौकशीसाठी बोलावण्यात आल्याच्या विरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करत होते. यादरम्यान, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सेठी यांच्या घरावर अंडी फेकली. त्यामुळे पोलीस आणि आंदोलकांदरम्यान, जोरदार वादावादी झाली. याचदरम्यान, मधमाश्यांनी आंदोलन करत असलेल्या लोकांवर हल्ला केला.
मधमाश्यांच्या हल्ल्यादरम्यान, पोलील अधिकाऱ्यांपासून ते आंदोलक आणि तिथे उपस्थित असलेले पत्रकार असे सर्वजण जमिनीवर बसून, झोपून स्व:ला वाचवण्याचा प्रयत्न करू लागले. त्यामुळे घटनास्थळी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलनासाठी सोबत आणलेल्या पोस्टरखाली लपून बसले. तर काही जण मधमाश्यांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी जमिनीवर झोपले.
दरम्यान, आता या घटनेचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लोक जमिनीवर झोपून स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे घटनास्थळावर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.